'त्या' बंदुका वारसा हक्काने आल्यात, मी शांतताप्रिय नेता

'त्या' बातमीवर मंत्री केसरकरांचं स्पष्टीकरण
Edited by: विनायक गांवस
Published on: April 03, 2024 08:35 AM
views 615  views

सावंतवाडी : माझ्याकडे पिस्तूल नाही. एक शांतता प्रिय नेता म्हणून माझी सर्वत्र ख्याती आहे असे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी म्हंटले आहे. मात्र, वडिलांच्या काळात बंदुका होत्या. त्या वारसा हक्काने प्राप्त झाल्या आहेत. या शस्त्राचा पुजनासाठी वापर करतो. गेल्या ५० वर्षात या शस्त्राचा वापर झालेला नाही असे मंत्री केसरकर यांनी म्हटले आहे.

दीपक केसरकर यांच्यासह अवघ्या १३ जणांना शस्त्र जमा करण्याचे आदेश अशा मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली आहे. या बातमीत सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी जामिनावर मुक्तता झालेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आणि कोणत्याही वेळी खास करुन निवडणूक कालावधीमध्ये दंगलीत समावेश असलेल्या व्यक्तींना शस्त्रे पोलिस ठाण्यात जमा करण्याबाबत कळविण्यात आले आहे असा उल्लेख आहे. या १३ जणांच्या नावाच्या यादीमध्ये सर्वांत शेवटी माझे नाव आहे असाही उल्लेख आहे. याबाबत मी कळवू इच्छितो की, माझ्यावर वर उल्लेख केलेल्या गुन्ह्यांपैकी कोणताही गुन्हा दाखल नाही. आतापर्यंत माझ्यावर अशा स्वरुपाचा कोणतेही आरोपही नाहीत. एक शांतताप्रिय नेता अशी माझी सर्वत्र ख्याती आहे. माझ्याकडे कोणतेही पिस्तुल नाही. माझ्या वडिलांच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडे २ बंदुकांचा परवाना होता. त्यातील १ बंदुक ही वारसाने मला प्राप्त झाली व १ बंदुक माझ्या वडील बंधुंना प्राप्त झाली. वडीलांची एक आठवण म्हणुन ही शस्त्रास्त्रे आजही पुजनासाठी आम्ही वापरतो. गेल्या ५० वर्षात या शस्त्रांचा कोणताही वापर झाला नाही. निवडणूक कालावधीत सर्वांची शस्त्रास्त्रे जमा करण्याचे आदेश पारीत होतात. त्याप्रमाणे आमच्याकडे असलेली शस्त्रास्त्रे वेळोवेळी जमा करतो.

नव्याने झालेल्या कोर्टाच्या निर्णयानुसार सर्वांची शस्त्रे सरसकट जमा करणे योग्य नसल्याने योग्य कारण असल्यास ती हत्यारे जमा न करण्याबाबत बंधन प्रशासनावर घालण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व शस्त्र धारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. २५० शस्त्र धारकांपैकी १३ लोकांना नोटीसा दिल्या अशी बातमी दिशाभूल करणारी आहे. केवळ शस्त्राचा परवाना असल्याने अशाप्रकारची बदनामी होणे गैर आहे असे केसरकर यांनी म्हटलं आहे.