गोबी मंच्युरीयनमध्ये फुड कलर न वापरण्याचा निर्णय...!

Edited by: विनायक गावस
Published on: March 18, 2024 14:05 PM
views 173  views

सावंतवाडी : ग्राहकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेता गोबी मंच्युरीयनमध्ये फुड कलर न वापरण्याचा निर्णय गोबी मंच्युरियन संघटनेच्यावतीने घेण्यात आला आहे. कोणताही व्यापारी कलर वापरताना आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा गोबी मंच्युरीयन सिंधुदुर्ग संघटनेचे अध्यक्ष वैभव घोगळे यांनी दिला आहे.

गोवा व कर्नाटक येथे परप्रांतीय विक्रेत्यांकडून गोबी मंच्युरियन मध्ये मोठ्या प्रमाणात कलर वापरण्यात येतो. हा कलर आरोग्यास हानिकारक असल्याने त्या ठिकाणी गोबी मंच्युरियन विक्री बंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे झालेल्या बैठकीत संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी हा निर्णय घेतला आहे. यात ग्राहकांच्या आरोग्याचा विचार लक्षात घेता आरोग्यास अपायकारक असा कोणताही फूड कलर न वापरण्याचा एक मताने निर्णय घेण्यात आला तसेच स्थानिक किंवा विशेषतः अन्य ठिकाणावरून आलेल्या परप्रांतीय विक्रेते कलर वापरत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असा एकमुखी ठराव उपस्थित व्यावसायिकांकडून घेण्यात आला. यावेळी श्यामसुंदर मालवणकर, हेमंत पांगम, मधुकर भाईडकर, अशोक  कोरगावकर, दीपा पार्सेकर, अर्जुन पारकर, अश्रफ शेख, आबा धुरी, विलास नारकर, निलेश घावनळकर, विश्वास गवंडे आदी व्यावसायिक उपस्थित होते.