
दोडामार्ग : तेरवण मेढे येथील उन्नैयी बंधाऱ्यात एका ३५ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. दत्तप्रसाद सुभाष गवस (३५) रा. पिकुळे असे त्या युवकाचे नाव असून गुरुवारी सायंकाळच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला आहे.
तेरवण मेढे उन्नैयी बंधाऱ्याजवळ गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एक दुचाकी उभी असल्याचे तेथील सुरक्षा रक्षकांना दिसली. तिथे जाऊन पाहिले असता दुचाकीस्वार किंवा व्यक्ती तेथे दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी याची माहिती पोलिसांना तात्काळ दिली. दुसरा दिवस उजाडला तरीही दुचाकी तेथेच उभी होती. याची माहिती तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये दुचाकी कोणी उभी केली? याची पाहणी केली. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी दुचाकी सोबत एक व्यक्ती उभी असल्याचे कॅमेऱ्यात दिसू आले.
संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उन्नैयी बंधार्याजवळ पाहिले असता एक मृतदेह त्यांना वर आल्याचा दिसला. त्यांनी तात्काळ दोडामार्ग पोलिसांना याची माहिती दिली. काही वेळातच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर त्याची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी रीतसर पंचनामा करून मृतदेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणला. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अधिक तपास पोलिस करत आहेत. त्याच्या पश्चात वडील व एक भाऊ, विवाहित बहीण आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.










