नाटळ येथील गोविंद भाऊराव सावंत यांचे निधन

Edited by: समीर सावंत
Published on: March 13, 2023 13:09 PM
views 231  views

कणकवली : नाटळ गावचे परोपकारी व्यक्तिमत्व, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक गोविंद भाऊराव सावंत तथा बाबुराव गुरूजी यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८७ वर्षे होते.

 त्यांच्या निधनाने जाणते मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरवल्याची भावना नाटळ दशक्रोशीतून व्यक्त होत आहे. नाटळ गावच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. गावच्या शैक्षणिक, सामाजिक तसेच देवस्थानच्या कार्यात ते नेहमी अग्रेसर असत. त्यात त्यांनी अमुल्य असे योगदान दिले. १९८० च्या दशकात अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत नाटळ माध्यमिक विद्यालयाच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यावेळी ते संस्थेच्या स्थानिक कमिटीच्या सचिवपदी कार्यरत होते.

देवस्थानच्या कामात त्यांचा सल्ला मोलाचा मानला जात असे. वृद्धत्व आल्याने ते सध्या त्यांचे चिरंजीव शासकीय ठेकेदार प्रशांत सावंत यांच्याकडे राजापूर येथे राहत होते. नाटळ गावच्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत सर्वस्तरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या पश्चात चार मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नाटळ माध्यमिक विद्यालय स्थानिक कमिटीचे माजी अध्यक्ष सदानंद तथा भाई सावंत, नाटळ विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन नंदकिशोर सावंत, जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक आर. बी. सावंत यांचे ते चुलत बंधू होत.