LIVE UPDATES

विद्युत कुंपणामुळे मृत्यू ,संशयिताची निर्दोष मुक्तता

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 16, 2026 15:40 PM
views 84  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड : साळशी कुवळ्याची वाडी येथे शेत संरक्षणासाठी केलेल्या अवैध विद्युत कुंपणाला स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून कामगार महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रकरणी जागामालक शेतकरी महेश भटसाळकर यांची देवगड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एस. एस. पंचडी यांनी सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता केली आहे. याकामी आरोपीच्या वतीने ॲड  कौस्तुभ मराठे व ॲड प्रणाली आचरेकर यांनी यशस्वी युक्तिवाद केला.

दि. 20/11/2018 रोजी साळशी गावातील कुवळ्याची वाडी येथे असलेल्या ऊसाच्या शेतामध्ये मृत महिला गवत काढण्याचे काम करीत होती. सदर शेताभोवती जागामालक संशयित आरोपी महेश भटसाळकर यांनी विद्युत विभागाची परवानगी न घेता उच्च विद्युत दाब असणाऱ्या ॲल्युमिनियम तारेचे कुंपण उभारले होते. सदर कुंपण जंगली जनावरांपासून संरक्षण होण्यासाठी उभारण्यात आले होते.

सदर कुंपणामध्ये विद्युत प्रवाह सोडल्याबाबत माहिती देण्यात आली नव्हती. मृत महिलेच्या हाताचा स्पर्श त्या कुंपणाला होताच प्रचंड वेगाने विजेचा झटका लागून सदर महिला जागीच मृत्यूमुखी पडली होती.

देवगड पोलिसांनी जागामालक महेश भटसाळकर यांच्यावर भा.दं.वि. कलम 304 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, विद्युत पुरवठ्याचे उगमस्थान सिद्ध न होणे या त्रुटी आरोपीच्या वकिलांनी मे. न्यायालयासमोर मांडल्या होत्या.सुनावणीअंती देवगड न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.