रासायनिक खताला जीवामृत पर्याय..!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 30, 2023 12:13 PM
views 71  views

सिंधुदुर्ग : शेतीमध्ये रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी जीवामृत उत्तम पर्याय असून मोलाचे कार्य करते. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जीवामृताचा वापर करावा. अशी माहिती रानबांबूळी येथील शेतकऱ्यांना कृषी कन्यानी दिली.

डॉ. बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ मान्यता प्राप्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस सिंधुदुर्गनगरी च्या चौथ्या वर्षात शिकत असलेल्या कृषी कन्यांनी  आज रानबांबुळी गावातील नागरिकांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या प्रेरणेतून विषमुक्त शेतीसाठी नैसर्गिक खताचा वापर करण्यासाठी जीवामृत हे सर्वात मोलाचे काम करते, उत्पादन क्षमता वाढते, रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी जीवामृत हे उत्तम पर्याय असल्याने यावेळी जीवामृत बनविण्याचे प्रात्यक्षीक दाखविण्यात आले. यावेळी रानबांबूळी येथील सरपंच परशुराम परब यांच्यासह शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते. 

पिकांची वाढ, कीड आणि रोगांबाबत प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जीवामृत तंत्रज्ञान महत्त्वाचे असल्याचे कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. यामध्ये कृषिकन्या प्रतीक्षा माळी, तन्वी गवस, वैष्णवी माळी, रेश्मा जाधव यांचा समावेश होता.