
चिपळूण : नागपूर येथे आयोजित ‘कला संमेलन २०२५’ या राष्ट्रीय स्तरावरील नृत्य स्पर्धेत चिपळूणच्या नवकोकण एज्युकेशन सोसायटी संचलित डी.बी.जे. महाविद्यालयाच्या प्राध्यापिकांनी दमदार कामगिरी करून कथ्थक नृत्यप्रकारात प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत देशभरातून तब्बल ७५० ते ८०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. खुल्या गटातून स्पर्धेत उतरलेल्या प्रा. डॉ. निलम शिंदे, प्रा. कांचन चिले-तटकरे, प्रा. शुभांगी इंगळे-कदम, प्रा. तृप्ती लाड-यादव, प्रा. अंकीता टाकळे-रेडीज आणि प्रा. सिद्धी खातू-साडविलकर यांनी समूह कथ्थक सादर करून परीक्षकांचे लक्ष वेधले आणि प्रथम पारितोषिकाचा मान मिळवला.
या प्राध्यापिकांना नृत्य गुरू, नृत्यालंकार स्कंधा परेश चितळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कौशल्य सिंधूतील नृत्यवर्गाच्या समन्वयक प्रा. सोनाली खर्चे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महाविद्यालयीन कामकाज आणि घरगुती जबाबदाऱ्या सांभाळून या प्राध्यापिकांनी कठोर मेहनत, सातत्यपूर्ण रियाज आणि परस्पर समन्वय साधत हे यश मिळवले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल न.ए. सोसायटीचे चेअरमन मंगेश तांबे, प्राचार्य डॉ. माधव बापट, रजिस्ट्रार अनिल कलकुटकी, व्हाईस चेअरमन डॉ. दीपक विखारे, उपाध्यक्ष प्रकाश जोशी, सेक्रेटरी अतुल चितळे, सहसेक्रेटरी अविनाश जोशी, खजिनदार संजीव खरे, तसेच नियामक समिती सदस्य आणि विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
डी.बी.जे. महाविद्यालयीन प्राध्यापक वर्ग, कर्मचारी, विद्यार्थी आणि समाजातील विविध स्तरांतून या यशाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला असून, राष्ट्रीय स्तरावर चिपळूण व डी.बी.जे. महाविद्यालयाचा झेंडा फडकावल्याबद्दल प्राध्यापिकांचे कौतुक होत आहे.