पुस्तक रूपातून 'दशावतार' भेटीला !

कर्नाटकी कलावंत सादर करणार मराठीतून 'यक्षगान'
Edited by: विनायक गांवस
Published on: May 09, 2024 14:25 PM
views 82  views

सावंतवाडी : सावंतवाडी राजवाड्याच्या प्रांगणात खुल्या रंगमंचावर कर्नाटक उडपी येथील "यक्षगान" प्रयोग मराठीमध्ये सादर होणार आहे. येत्या ११ मे रोजी सायंकाळी सहा वाजता हा प्रयोग होईल अशी माहिती युवराज लखमराजे भोंसले यांनी दिली. यावेळी प्रा. विजयकुमार फातर्पेकर लिखीत 'दशावतार' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा होणार आहे असं ते म्हणाले. यावेळी नाटककार प्रा. विजयकुमार फातर्पेकर, अँड शामराव सावंत, प्राचार्य डॉ दिलीप भारमल, प्रा दिलीप गोडकर, प्रा शिंत्रे उपस्थित होते.

पद्मगंधा प्रकाशन पुणे यांच्या वतीने कला आणि अभ्यास "दशावतार" या पुस्तकाचे लेखन प्रा. विजयकुमार फातर्फेकर यांनी केले आहे. दशावतार म्हणजे ग्रामीण जीवनातील लोककलेला फुटलेले अंकुर होत. यक्षगान व दशावतार या लोककला स्वतंत्र आहेत असे प्रा. विजयकुमार फातर्फेकर यांनी सांगितले.

दशावतार कला व अभ्यास या पुस्तकाचे प्रकाशन श्रीमंत खेमसावंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमंत शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते होईल. यावेळी गुरु संजीव सुवर्णा व अभिषेक जाखडे हे  प्रमुख उपस्थिती आहे .यानंतर यक्षगान चा प्रयोग मराठीतून सादर करणार आहेत. कर्नाटकातील उडपी येथील यक्ष संजीव यक्षगान केंद्राचे प्रमुख आचार्य व संस्थापक संचालक गुरु संजीव सुवर्णा आणि त्यांचे शिष्य गण हा प्रयोग सादर करणार आहेत. महाभारतातील महत्त्वाच्या कथाभागावर आधारित आख्यान चक्रव्यूह मराठी संवाद व पद्म रचनांसह सादरीकरण  लोककला अध्ययन केंद्र श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्यावतीने सादर केले जाईल.

राजघराण्याने राजाश्रय  देण्यासाठी मागील वर्षापासून लोककलांचे आयोजन सुरू केले आहे. आपल्याकडील दशावतार लोकप्रिय आहे यक्षगान आणि दशावतार लोककला स्वतंत्र आहे. अशा लोककलना राजाश्रय मिळाला पाहिजे. या लोककलेतून निश्चितपणे  वेगळेपणा शिकायला मिळेल आणि नक्कीच त्याचा फायदा कलाकारांच्या प्रगतीसाठी उपयोगी ठरेल असे युवराज लखमराजे भोसले म्हणाले .

यावेळी प्रा. विजयकुमार फातर्फेकर म्हणाले,  मी मागील ५३ वर्ष दशावतार कलेचा अभ्यास करत आहे. यादरम्यान कर्नाटक उडपी येथील यक्षगान अभ्यासले आहे. माझे पहिले पुस्तक यक्षगान प्रकाशित झाले. आता दशावतार होत आहे. दशावतारी कलेवर आकर्षित होऊन मी अभ्यास करून या पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यावर निश्चितच कलाकार आणि प्रेक्षकांनी स्वतंत्रपणे आपले मत मांडले पाहिजे. यक्षगान अभ्यास करताना माहिती गोळा केली ती दशावतार कलेसाठी देखील उपयोगी ठरली दशावतार आणि यक्षगान या लोककला स्वतंत्र असल्या तरी त्या लोकांना भावतात असे त्यांनी सांगितले.