सावंतवाडी राजवाडा इथं २४ जानेवारीला 'दशावतार महोत्सव' !

२८ जानेवारीला 'लोककला महोत्सव'
Edited by: विनायक गांवस
Published on: January 20, 2024 11:38 AM
views 262  views

सावंतवाडी : कोकणातील दशावतार कला ही जगप्रसिद्ध आहे. ही लोककला सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडीच्यावतीने 'दशावतार महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. तर २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता "लोककला महोत्सवाचे" आयोजन करण्यात आले आहे.

       सावंतवाडी राजवाड्याच्या निसर्गरम्य सुंदर वातावरणातील पटांगणात २४ जानेवारी ते २७ जानेवारी  या कालावधीमध्ये सायंकाळी ६.३० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत 'दशावतार महोत्सव ' होणार असून या महोत्सवाचे उदघाटन बुधवार दि. २४ जानेवारी  रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात येणार आहे.

      याबाबतची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे  कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रभारी प्राचार्य एम. ए. ठाकूर, प्रा. दिलीप गोडकर, डॉ. बी.एन. हिरामणी, डॉ. गणेश मर्गज, प्रा. बाळासाहेब नंदीहळळी, राजेंद्र बिर्जे, अण्णा देसाई व बाळू धुरी आदी उपस्थित होते.

      दरम्यान, या महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, युवराज्ञी सौ. श्रध्दाराजे भोंसले, संस्थेचे संचालक प्रा.डी.टी.देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, नियामक मंडळाचे सदस्य श्री. जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत आदि उपस्थित राहाणार आहेत.

      दशावतार महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून जिल्ह्यातील विविध दशावतारी मंडळाना व कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

        या दशावतार महोत्सवात बुधवार दि. २४ रोजी सायंकाळी  ६.३० ते रात्री ८ पर्यंत जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस - दांडेली यांचा ' टप्केश्वर तीर्थक्षेत्र' तर रात्री ८.३० ते १० पर्यंत वालावलकर दशावतार नाट्य मंडळ ओसरगांव यांचा ' लक्ष्मी पूजन ' हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.

      तर गुरुवार २५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० ते ८ चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवण यांचा ' अजिंक्य मणी' तर रात्री ८.३० ते १० कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर यांचा पराशक्ती दहन हा नाट्यप्रयोग होणार आहे.

     शुक्रवार २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० ते ८ आरोलकर दशावतार नाट्य मंडळ आरवली यांचा 'शिवमहिमा ' तर रात्री ८.३० ते १० वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ तेंडोली यांचा ' अघोर लक्ष्मी ' हा नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.

      तर महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी २७ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० ते ८ दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला यांचा ' मीनाश्री सुंदरेश्वर ' तर रात्री ८.३० ते १० नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळ मोचेमाड यांचा ' गणेश मंगळ युद्ध ' हा पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे.

      तर  सहयोग ग्रामविकास मंडळ गरड, माजगाव व श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता राजवाडा येथील पटांगणावर "लोककला महोत्सवाचे" आयोजन करण्यात आले आहे.

     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध लोककलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने व येथील लोककला टिकाव्यात व त्या वृदधींगत व्हाव्यात या हेतूने राजवाडा सावंतवाडी येथे सहयोग ग्रामविकास मंडळ, माजगाव व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. २८ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.०० ते १०.३० वा "लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

      या महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित लोककला मंडळे यांच्या कळसुत्री बाहुल्यांचा खेळ, छायानाट्य, राधानृत्य, चित्रकथी, गोंधळ, गोफनृत्य, चपई नृत्य, समई नृत्य, वासुदेव, पांगुळबैल अशा लोककलांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजेसाहेब खेमसावंत भोंसले, महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री मा. ना. श्री दिपकभाई केसरकर, संस्थेच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोंसले, कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले, युवराज्ञी सौ. श्रध्दाराजे भोंसले, संस्थेचे संचालक प्रा. डी.टी.देसाई, सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, डॉ. सतीश सावंत आदी उपस्थित राहाणार आहेत.

      या लोककला महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत लोककलावंत सहभागी होणार आहेत. यामध्ये राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, संगीत नाटक अकादमी भारत सरकारचा गुरुवर्य सन्मान प्राप्त, तसेच महाराष्ट्र राज्य आदिवासी गिरीजन राज्य सांस्कृतीक पुरस्कार प्राप्त श्री. बाळकृष्ण गणपत मसगे यांचे दयती लोककला संवर्धन अकादमी, पिंगुळी ता. कुडाळ यांचे कळसुत्री बाहुल्यांचा, चामड्याच्या बाहुल्यांचा शो, राधानृत्य, चित्रकथी, गोंधळ,  तसेच श्री गणेश लांबर यांचे अंबाई सिध्दाई चपई नृत्य ग्रुप परुळे, ता. वेंगुर्ले, तसेच  श्री विनायक जोशी यांचे संत लालाजी महिला समई नृत्य ग्रुप मठ, ता. वेंगुर्ला, सौ. विलासिनी नाईक यांचा सोमेश्वर महिला मंडळ वेतोरे, ता. वेंगुर्ला गोफ नृत्य ग्रुप सहभागी होणार आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.