रॉक गार्डनमध्ये अंधार...!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 20, 2024 13:02 PM
views 405  views

मालवण : मालवण शहरातील पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेले रॉक गार्डनमध्ये पर्यटकांची तुफान गर्दी आहे. परंतु तेथे सुविधा देण्यास नगरपरिषद अपयशी ठरली आहे. संपूर्ण रॉक गार्डन मध्ये अंधार पसरला आहे. म्युझिकल फाऊंटन, लहान मुलांचे बोटिंग बंद आहे. तिकीट काऊंटर सुद्धा बंद आहे. देखभाल दुरुस्तीसाठी प्रशासकाला वेळ नाही असे सांगत आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय अशी परिस्थिती झाली असल्याची टीका माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केली आहे. 

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी म्हटले आहे, मागील आठ दहा दिवसापासून मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच चाकरमानी मालवण शहरात दाखल झाले आहेत.  सिंधुदुर्ग किल्ला, स्कुबा, वॉटर स्पोर्ट्स याला पर्यटकांची पसंती आहेच पण त्याच बरोबर मालवण शहरात समुद्रकिनारी असलेले रॉक गार्डनला पण असंख्य पर्यटक भेट देत आहेत.   तसेच मालवण शहरातील नागरिक,  चाकरमानी यांची पण रॉक गार्डन ला पसंती आहे. लोकप्रतिनिधीनी आपापल्या कालावधी मध्ये या रॉक गार्डनची प्रसिद्धी वाढविण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आमच्या कालवधीमध्ये कोकण पट्ट्यात नाही असा एकमेव म्युझिकल फाउंटन या रॉक गार्डन मध्ये बसविण्यात आला आहे. लहान मुलांसाठी खेळणी, बोटिंगची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांची पसंती आहेच पण त्याचबरोबर स्थानिकाची पण पसंती आहे. 

पण याच्या देखभाल दुरुस्तीकडे बघायला सध्या प्रशासकाकडे वेळ नाही.  सध्या प्रचंड गर्दी असताना रविवार सारख्या दिवशी याठिकाणी लाईट बंद, म्युझिकल फाउंटन बंद अशी परिस्तिथी आहे.  गार्डन बघायला येणाऱ्या व्यक्ती कडून पाच रुपये प्रवेश फी घेतली जाते. ज्यापासून नगर परिषदेला लाखो रुपयाचे उत्पन्न प्राप्त झाले आहे असा तिकीट काउंटर पण रविवार सारख्या दिवशी बंद ठेवला जातो. मागील दोन अडीज वर्षे बोटिंग बंद आहे. टॉयलेट व्यवस्था अपुरी पडत असल्याने याठिकाणी आमच्या कालवधीत सुमारे २५ लाख खर्च करुन घेण्यात आलेल्या पाच गाडयापैकी एक गाडी आणून ठेवण्याबाबत दोन वर्षापासून सुचित करूनही कुठलीही कार्यवाही नाही. हे सगळं म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातंय अशी परिस्थिती झालेली आहे.  लोकप्रतिनिधीनी सूचना करूनही शहर विकासाच्या कुठल्याही बाबतीत प्रशासकाची अनास्था आहे.  त्याच्यावर कोणाचाही अंकुश नाही हेच अधोरिखित होत आहे. लोकप्रतिनिधी आपापल्या क्षमतेप्रमाणे आपल्या शहराचा विकास होण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात. पण ज्याना कोणाला शहराच्या विकासाचे काही देणे घेणे नसते असा एखादा अधिकारी विकासकामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन जर शहराची वाट लावत असेल तर त्याच्या वर लोकप्रतिनिधीच्या गैरहजेरीत कोण अंकुश ठेवणार हे एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असे महेश कांदळगांवकर यांनी म्हटले आहे.