
दापोली : दापोली विधानसभा मतदारसंघात नामसाधर्म्य असलेल्या उमेदवारांची परंपरा याहीवर्षी अबाधित राहिली आहे. राजकारणात प्रतिस्पर्धी उमेदवाराला नामोहरम करण्यासाठी विविध डावपेच आखले जातात. प्रतिस्पर्धी उमेदवाराबाबत संभ्रम निर्माण करण्यासाठी उमेदवाराच्या नावाशी, आडणावाशी साम्य असलेल्या व्यक्तीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले जाते. या नाम साधर्म्याचा फटका प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या उमेदवाराला बसत असून त्यामुळे मतदारांचाही गोंधळ उडणार आहे.
शिवसेनेचे उमेदवार योगेश रामदास कदम यांनी २४ व २८ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला असून कदम योगेश रामदास व कदम योगेश विठ्ठल या नामसाधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अपक्ष उमेदवार कदम योगेश रामदास (वडिलांचे नाव कदम रामदास लक्ष्मण) हे कात्रप, बदलापूर जिल्हा ठाणे येथील रहिवासी असून कदम योगेश विठ्ठल हे खेड तालुक्यातील नांदिवली येथील रहिवासी आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार कदम संजय वसंत यांनी २४ ऑक्टोबर व २९ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले असून कदम संजय संभाजी व कदम संजय सीताराम या नामसाधर्म्य असलेल्या दोन उमेदवारांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अपक्ष उमेदवार कदम संजय संभाजी हे खेड तालुक्यातील नांदिवली केळेवाडी येथील रहिवासी असून कदम संजय सीताराम हेही खेड तालुक्यातील हुंबरी खालची या गावचे रहिवासी आहेत. नामसाधर्म्य असलेले या उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्यास शिवसेनेचे योगेश रामदास कदम व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कदम संजय वसंत यांची डोकेदुखी वाढणार आहे.