दापोली विधानसभेसाठी 2 अर्ज दाखल

Edited by: मनोज पवार
Published on: October 24, 2024 13:32 PM
views 278  views

दापोली : गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त साधून आज दापोली विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी २ उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे सादर करण्यात आले. 

महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना (उद्धव बाळसाहेब  ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजय कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेनेचे योगेश कदम यांनीहि उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचेकडे आज सादर केला. 

महायुतीच्या वतीने दापोली शहरातील आझाद मैदान येथे प्रथम शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते त्यात सुमारे ५ हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यात महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना व आरपीआयचे पदाधिकारी होते, मात्र महायुतीमधील भाजपचा एकही पदाधिकारी उपस्थित नव्हता. आझाद मैदान येथून रॅलीने योगेश कदम उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आले व तेथे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचेसोबत शिवसेना नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, योगेश कदम यांच्या मातोश्री, बंधू, पत्नी, लहान मुलगी यांचा समावेश होता तसेच शिवसेना  तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस व आरपीआय चे पदाधिकारी उपस्थित होते. 

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आ. योगेश कदम म्हणाले कि या निवडणुकीत आपण ५० हजार पेक्षा अधिक मताधिक्य मिळवून विजयी होणार असल्याचा आपल्याला आत्मविश्वास आहे. आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगोदर आपण भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. आपल्याला विजयाची संपूर्ण खात्री आहे.