तिलारीच्या पाण्यासाठी धरणग्रस्तांचा उपोषणाचा इशारा !

Edited by: संदीप देसाई
Published on: January 16, 2024 09:58 AM
views 57  views

दोडामार्ग : तिलारी प्रकल्पाच्या माध्यमातून कालव्याचे पाणी गोवा राज्यासह सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील गावांना देण्यात आले. मात्र ज्या धरणग्रस्त शेतकरी बांधवांनी या धरणासाठी आपल्या शेत जमिनी, घर दार त्याग केली. त्याच शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत तिलारी कालव्यांचे पाणी मिळावे यासाठी तब्बल 20 वर्षे पाठपुरावा करूनही जलसंपदा विभाग दाद देत नाहीय. झरेबांबर येथील शेतकऱ्यांना तिलारी डाव्या कालव्यातून पाईपलाईनद्वारे शेतात पाणी नेण्याच्या कामात मोठी दिरंगाई होत आहे. त्यामुळे हे काम तात्काळ सुरू न झाल्यास झरेबांबर ग्रामपंचायत कार्यालय समोर प्रजासत्ताक दिनी उपोषण छेडण्याचा इशारा धरणग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांनी दिला आहे. 

      याबाबत  तिलारी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनही देण्यात आले आहे. यात म्हटले आहे, तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अखत्यारीत असलेल्या मुख्य कालव्यातून  झरेबांबर येथे शेतात पाईपलाईन द्वारे पाणी नेण्याच्या प्रस्तावास मंजुरी आहे.  गेल्या चार वर्षांपूर्वी प्रत्यक्ष कामास सुरुवात देखील झाली कामासाठी शासनाच्या तिजोरीतून लाखो रुपये खर्चही झाले. मात्र प्रथमदर्शनी कोणतीही अडचण नसताना देखील या कामात फार जाणीवपूर्वक दिरंगाई होत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. महिन्याभरापूर्वी कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते.  त्यावेळी एका महिन्याच्या आत काम पूर्ण होऊन शेतात पाणी येईल असे आश्वासन शेतकऱ्यांना त्यांनी दिले . मात्र अद्याप पर्यंत शेतात पाणी आले नाही. पाटबंधारे कार्यालयाकडून वारंवार तारखा देऊन शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. तिलारी पाटबंधारे प्रकल्पासाठी आमची घरे, शेती, जमिनी संपादित झालेल्या आहेत. त्यामुळे येत्या दहा दिवसात कामास सुरुवात करून आमच्या शेतीसाठी पाणी द्यावे. अन्यथा २६ जानेवारी रोजी जरीबांबर ग्रामपंचायत समोर उपोषण करण्याचा इशारा मधुकर सावंत, हरी गवस, पांडुरंग सावंत, होनाजी सावंत, पांडुरंग चौगुले व ग्रामस्थांनी दिला आहे. वर्षभरापूर्वी अधिक्षक अभियंता थोरात यांनीही सरपंच व ग्रामस्थ यांना आश्वासन दिलं होत. मात्र कार्यवाही करण्यात आली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.