
कुडाळ : क्रेडाई कोल्हापूरच्यावतीने आयोजित बहुप्रतीक्षित 'दालन २०२६' या गृहप्रदर्शन व वास्तू प्रदर्शनाचा शुभारंभ येत्या ३० जानेवारी रोजी होणार आहे. कोल्हापूरच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीला नवी दिशा देणारे हे प्रदर्शन सलग चार दिवस चालणार असल्याची माहिती क्रेडाईच्या वतीने कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूरचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून: खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, हसन मुश्रीफ (वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री), प्रफुल्ल तावरे (अध्यक्ष, क्रेडाई महाराष्ट्र), खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, माजी आमदार अमल महाडिक, माजी आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार धनंजय महाडिक, विद्यानंद बेडेकर (उपाध्यक्ष, क्रेडाई महाराष्ट्र) यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
१७० स्टॉल्सचा सहभाग: प्रदर्शनातील सर्व १७० स्टॉल्सचे बुकिंग पूर्ण झाले असून, ग्राहकांना एकाच छताखाली विविध पर्याय उपलब्ध होतील. नामांकित बांधकाम प्रकल्प, बँकांचे गृहकर्ज विभाग आणि नवीन बांधकाम तंत्रज्ञानाची माहिती येथे मिळेल.या प्रदर्शनानिमित्त क्रेडाईतर्फे एका विशेष स्मरणिकेचे प्रकाशनही केले जाणार आहे.
गुंतवणुकीचे नवे केंद्र
सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात खंडपीठ कार्यान्वित झाल्याने शहराचा विस्तार आणि ओघ वाढत आहे. "ज्याप्रमाणे सोने-चांदीचे दर वाढतात, त्याचप्रमाणे रिअल इस्टेटमधील दरही वेगाने वाढत आहेत. त्यामुळे ही गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी आहे," असे मत क्रेडाई सदस्यांनी व्यक्त केले. "कोल्हापूर खंडपीठात काम करणारे वकील, शिक्षणासाठी कोल्हापुरात राहणारी मुले आणि व्यावसायिकांसाठी हक्काचे घर घेण्याची ही उत्तम वेळ आहे."
या पत्रकार परिषदेला शैलेंद्र अलमन, केतन शहा, पवन जामदार, सागर नालंग, गजानन कांदळगावकर, अभिजीत जैतापकर, अभय वालावलकर आदी क्रेडाईचे पदाधिकारी उपस्थित होते.










