
कणकवली : प्रेम दया प्रतिष्ठान मुंबई व श्री. स्वामी समर्थ मठ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, १६ ऑगस्टला श्री. स्वामी समर्थ मठ कळसुली - घोडगे रोड येथे सायंकाळी ५ ते रात्री ९ यावेळेत दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आठ थरांची दहीहंडी फोडणाऱ्या पथकाला ५५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस आहे. दहीहंडी उत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी, मुंबई येथील गोविंदा पथके सहभागी होणार आहेत. सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
दहीहंडी उत्सवानिमित्त विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सायंकाळी ४ वा. प्रेम दया प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष हनुमंत सावंत व उपस्थित प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते दहीहंडी स्पर्धेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ होणार आहे. स्पर्धेदरम्यान नृत्य अविष्कार सादर होणार आहेत. दहीहंडी उत्सवामध्ये कळसुली पंचक्रोशीसह जिल्ह्यातील गोविंदापथके आणि रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी किरण सावंत, ओमकार दळवी, राकेश पवार यांच्या जवळ संपर्क साधावा, असे आवाहन प्रेम दया प्रतिष्ठान मुंबईचे अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी केले आहे.