
सावंतवाडी : दशावतार समाजप्रबोधन करणारी कला असूनही त्याला राजाश्रय नाही ही खंत आहे. मात्र, फार मोठा लोकाश्रय या कलेला आहे. माझ्या जन्मभूमीत मिळालेला पुरस्कार माझ्यासाठी लाखमोलाचा आहे असे भावोद्गार ज्येष्ठ दशावतार कलावंत दादा राणे कोनसकर यांनी काढले. श्रीराम वाचन मंदिर व स्व. दीपक नेवगी कुटुंबिय आयोजित वर्धापन दिन समारंभावेळी ते बोलत होते.
श्रीराम वाचन मंदिर आणि ॲड. दीपक नेवगी कुटुंबियांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्रीराम वाचन मंदिरच्या १७५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ॲड. दीपक नेवगी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कै. ॲड. दीपक नेवगी स्मृती पुरस्कार ज्येष्ठ दशावतार कलावंत दादा राणे कोनसकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर व्याख्याते तथा नाट्य कलाकार नंदू पाटील, संस्थेचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष ॲड.संदीप निंबाळकर, सचिव रमेश बोंद्रे, ॲड. पी. डी. देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री. राणे कोनसकर म्हणाले, दशावतार कलावंत चेहऱ्याला रंग लावतो अन् जीभेवर सरस्वती नांदते. मात्र, आज पुरस्कार स्वीकारल्यानंतर काय बोलाव यासाठी शब्द सुचत नाहीत. दशावतार कलावंताला काय मिळत असेल तर ते लोकांचे आशीर्वाद आहेत. समाजप्रबोधन करणारी कला असूनही त्याला राजाश्रय नाही ही खंत आहे. मात्र, फार मोठा लोकाश्रय या कलेला आहे. दशावतार कलेत माझी चौथी पिढी, दशावतार सादरीकरणात खूप आनंद मिळतो. दशावतार कला कोकणातच जन्मलेली आहे. ती चोरून आणलेली कला नाही. तीची आयुमर्यादा कोणीही सांगू शकत नाही.
दरम्यान, या निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कलाकाराने स्वमग्न न राहता सामाजिक योगदान दिले पाहिजे असे मत नाट्य कलावंत व्याख्याते नंदकुमार पाटील यांनी व्यक्त केले. वाचनालय विद्येचे मंदिर आहे, देवाच्या मंदिराला सरकार निधी देत. पण, सरस्वतीच्या मंदिराचा निधी गोठवून ठेवते हे दुर्भाग्य आहे. सरकारने वाचनालयांचा निधी रिलीज करावा असेही मत व्यक्त केले. तर दशावतार सादर करणे अत्यंत कठीण आहे. त्याला संहिता नसते, ती डोक्यात असते. त्यामुळे दशावतार कलाकारांपुढे मी नतमस्तक होतो. अभिनयाची गरज प्रत्येक क्षेत्रात असते. व्यापारापासून राजकारणात सगळीकडे आज प्रत्येकजण अभिनय करताना दिसून येतो. राजकारणी तर सर्वोत्तम अभिनेते असतात. कविता ही भावनेसहित यावी तर ती श्रोत्यांच्या मनापर्यंत पोचते. तसेच इथल्या पारितोषिकांमध्ये अडकू नका, कामं करा आणि पुढे जा असा संदेश त्यांनी कलाकार, साहित्यिकांना दिला. मराठी कलाकारांच्या नादी कोणी लागत नाही. कारण, मराठी सिने कलाकार शिस्तबद्ध असतो, तो एकाच सीन मध्ये शॉट ओके करतो. हिंदी कलाकारांचे २०-२५ रिटेक असतात. कलाकाराने स्वमग्न न राहता सामाजिक योगदान दिले पाहिजे असे मत व्याख्यानातून मांडले. यावेळी प्रा. प्रवीण बांदेकर, डॉ. जी.ए. बुवा, अभय नेवगी, दीपक पटेकर, मधुकर मातोंडकर, विठ्ठल कदम, डॉ. विनया बाड, वंदना करंबेळकर, तानाजी वाडकर, मोहन जाधव, सखी पवार, अभय परुळेकर, दत्ताराम सडेकर, सुहासिनी सडेकर, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, दिपाली नेवगी आदींसह साहित्यिक, वाचनप्रेमी सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. संदीप निंबाळकर यांनी केले. पुरस्कार परिचय ॲड. पी. डी.देसाई यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुमेधा नाईक-धुरी यांनी, तर आभार रमेश बोंद्रे यांनी मानले.










