
सावंतवाडी : शहरातील मोती तलाव परिसरात गॅस पाईपलाईनच्या कामामुळे खोदलेल्या चर बुजविण्यात आले. रोड रोलर सहाय्याने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाद झाला होता. माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संजू परब यांनी काल एम.एन.जी.एल.च्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत दिलेल्या इशाऱ्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली आहे.
आज सकाळपासून या परिसरात दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. रोलरच्या सहाय्याने रस्त्यावर सपाटीकरण करत सायंकाळी पाणी मारण्यात आले. शहरात सध्या गॅस पाईपलाईनचे काम सुरू आहे. मोती तलाव परिसरात हे काम सुरू असताना रस्ता खोदल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. यावेळी संजू परब यांनी आक्रमक पवित्रा घेत शिवसेना स्टाईलने एम एन जी एल कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी वाद देखील निर्माण झाला होता. यावेळी या रस्त्यावर रोलर फिरवणे आणि धूळ न बसवण्यासाठी पाणी मारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. तसेच शहरातील इतर रखडलेले काम पूर्ण करण्यासही सांगितले होते. श्री. परब यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर कंपनी प्रशासनाने तातडीने दखल घेतली. सकाळीच मोती तलाव परिसरात रोलर फिरवून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला.









