
सावंतवाडी : परिसरात दहशत माजवणाऱ्या आणि वारंवार गुन्हेगारी कृत्यांत सहभागी असणाऱ्यावरून पोलिसांनी आता कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आरोंदा (ता. सावंतवाडी) येथील सोनू उर्फ अमित दिवाकर निवजेकर (वय ३१) याला सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
सोनू निवजेकर याच्यावर मारामारीचे ६ गंभीर गुन्हे दाखल असून अनेक अदखलपात्र गुन्ह्यांचीही नोंद आहे. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, सावंतवाडी यांच्याकडे सादर केला होता. हा प्रस्ताव मंजूर होऊन हद्दपारीचे आदेश प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने कारवाईची चक्रे फिरवली. दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करत पोलिसांनी अमित निवजेकर याला ताब्यात घेतले. त्यानंतर दोन पोलीस अंमलदारांच्या देखरेखीखाली त्याला गोवा राज्यात त्याच्या नियोजित वास्तव्याच्या ठिकाणी नेण्यात आले. तेथील स्थानिक पोलीस ठाण्यात त्याला हजर करून हद्दपारीच्या आदेशाची कायदेशीर बजावणी करण्यात आली आहे.









