मालवणी मुलूखातील 'दादागिरी' !

'सुर्गेंचो वळेसारा'चा काव्य सुगंध दरवळणार !
Edited by: विनायक गांवस
Published on: May 24, 2025 15:31 PM
views 61  views

 'चांन्याची फुला', 'आबोलेचो वळेसार', 'कोकण हिरवेगार' अन् सोमवारी राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री अँड आशिष शेलार यांच्या हस्ते पु. ल. देशपांडे साहित्य अकादमी, लोककला दालन येथे प्रकाशित होणारा 'सुरंगीचो वळेसार' असे मालवणी काव्यसंग्रह लिहिणारे मालवणी मुलूखातील ज्येष्ठ साहित्यिक, सुप्रसिद्ध मालवणी कवी गोविंद उर्फ दादा मडकईकर. आपल्या खास शैलीनं रसिकांच्या हृदयात वेगळं स्थान निर्माण केलेला हा दादा माणूस. कोकणातली लोकसंस्कृती, सणवार, परंपरा, लोककला आणि इथला निसर्ग त्यांनी आपल्या वाङ्मय निर्मितीतून उलगडला आहे. त्यांच्या सुर्गेंचो वळेसार मालवणी काव्यसंग्रह आणि ४५० मालवणी म्हणी या पुस्तक प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या साहित्य वाटचालीवर टाकलेला हा प्रकाशझोत.

दादांचं बालपण खुप कष्टात गेलं. वयाच्या चौदाव्या वर्षी वडीलांचं छत्र हरपलं. कुटुंबात सहा भावंड असल्यानं दादांना लवकर शाळा सोडावी लागली. जबाबदारी नावाच ओझं तरूण वयात त्यांच्या खांद्यावर आलं. त्यांनी उदरनिर्वाहासाठी काहीकाळ भुसारी दुकानात काम केलं. तदनंतर त्यांना बॅंकेत शिपाई म्हणून काम मिळालं. यातून त्यांनी आपल्या कुटुंबाला आधार दिला. या दरम्यान त्यांना फावला वेळ मिळायला लागला. निसर्ग, कोकण, प्रथा परंपरा इथली बोली याविषयी ते संवेदनशील होते. तसेच शब्दांना आकार देण्याची कला त्यांना अवगत होती. यातच राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये कविवर्य डॉ. वसंत सावंत यांच्याशी त्यांची भेट झाली. डॉ. सावंत 

यांच्यामाध्यमातून सावंतवाडीत कोजागिरी कवी संमेलन भरवलं जायचं. राज्यातील नामवंत साहित्यिक यानिमित्ताने सावंतवाडीत यायचे. दादांनी या कवी संमेलनात सहभाग घेतला. सुरुवातीला ते मराठी कविता लिहीत होते. मालवणी कविता खूप कमीजण लिहीत. सावंतवाडीचे तात्या भांगले मालवणी कविता लिहीत. पण, त्याची कुठे प्रसिद्धी करत नसत. त्यांनी एकदा दादांना बोलावून मालवणी कविता ऐकवली. त्यानंतर मालवणीतली गंमत दादांना उमगली अन् 'खोल खोल दरीत गो चांन्याची फुला' ही पहिली मालवणी कविता  लिहीली‌ गेली. दादा मडकईकर यांनी पुथ्वीवरचा स्वर्ग म्हणजेच आंबोलीचं वर्णन त्यात  केलं आहे. ही कविता त्यांनी एका संमेलनात म्हंटली होती. पण, त्या कवितेला तसं कुणी विचारलं नव्हतं. मात्र, एका संमेलनात गोव्याच्या एका संपादकांनी या कवितेला पहिला क्रमांक दिला. तेथून या कवितेनं यश संपादन केलं. रत्नागिरी जिल्ह्यातील अखिल भारतीय साहित्य संमेलनावेळी जवळपास तीन हजार कविता मागवल्या होत्या. त्यातून पन्नास कवित्या निवडल्या गेल्या. पन्नास पैकी पाच कवितेत दादांच्या कवितेन स्थान पटकावलं अन् जवळपास वीस हजार लोकांसमोर 'चांन्याची फुला' ही कविता म्हंटली गेली. तिथून आजपर्यंत या कवितेला तुफान प्रतिसाद मिळत आहे. मालवणीचा प्रचार आणि प्रसार हे धेय्य त्यांनी ठेवलं आहे. जिथं बोलवलं जात तिथं कसलीही अपेक्षा न ठेवता मालवणी कवितांचे असंख्य कार्यक्रम त्यांनी आजवर केलेत. याच प्रेरणेतून अनेक लोक मालवणीतून लिहू लागले असून मालवणीचं बीज रूजत आहे. 

'कोकणसाद'च्या जागर कोकणच्या साहित्यरत्नांचा या सदरात दादांची विशेष मुलाखत घेतली होती. यावेळी त्यांच्या कवितेच्या प्रवासाबद्दल विचारलं असता ते म्हणाले, माझा हा प्रवास आनंददायी होता. समाजात वावरत असताना विषय मिळत गेले. मालवणी शब्दांतून वाक्य रचू लागली. इथल्या निसर्गाने मला लिहिते केलं. पदभ्रमणाची व सहलींची आवड असल्यामुळे जवळजवळ संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची मी फिरती केल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून माझ्या कवितेमध्ये इथला निसर्ग प्रामुख्याने सतत डोकावत असतो. इथली ऊन-सावली, वारा, पाऊस, डोंगर-दऱ्या, धुके-चांदणे, पशुपक्षी, फळे-फुले, नदी- नाले, इथल्या माणसांचे जीवनमान, इथला निळाशार सागर, या गोष्टींबरोबर इथल्या निसर्गातील संगीत सतत माझ्या तनामनात वाजत असते. त्यामुळे माझ्या छंदोबद्ध कवितांना मी संगीत न शिकताही हे संगीत गुणगुणताना माझ्या नकळत माझ्या कवितांना चाली लावल्या जातात. ही एक देवाची देणगीच आहे असे मी मानतो. माझ्या मागील तीनं काव्यसंग्रहांना चांगला प्रतिसाद मिळाला. आता चौथ पुस्तक प्रकाशीत होत आहे. लवकरच ते भेटीला येईल. मी गाणं शिकलो नाही पण अनुभवातून शिकत गेलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


आजवर चांन्याची फुला, आबोलेचो वळेसार, कोकण हिरवेगार हे दादांचे प्रकाशीत काव्यसंग्रह आहेत. ही निसर्गाची नाव काव्यसंग्रहास देण्यामागे एक विशेष संकल्पना होती. कोकणी माणूस, इथला निसर्ग हे त्याच मूळ आहे‌. आता 'सुरंगीचो वळेसार' नावाचं काव्यसंग्रह वाचकांच्या भेटीला येत आहे. निसर्गानं जे दिलं त्याच नाव पुस्तकाला द्याव असा उदात्त हेतू यामागे आहे. सुरंगीचो वळेसार या पुस्तकात जवळपास ४० कविता आणि ४५० अस्सल मालवणी म्हणी वाचता येणार आहेत. सिंधुबोली या त्यांच्या पुस्तकातही मालवणीतील काही दुर्मिळ शब्द संग्रह आहेत. 'अ' पासून 'ज्ञ' पर्यंतचे मालवणी बोली भाषेतील शब्द यात आहे‌त. येणाऱ्या पिढीसाठी हे मालवणी शब्दकोश मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही. कोकणातील या दादांची दादागिरी फक्त कोकणापुरती चालते का ? तर तसं मुळीच नाही. गोवा, कर्नाटकातही त्यांचा दरारा आहे. बेळगांव सारख्या सीमाभागत सुद्धा त्यांचे मालवणी कवितेचे कार्यक्रम झालेत. मोठा प्रतिसाद कवितांना मिळाला आहे. गोवा राज्यातील साखळी, डिचोली, पेडणे या भागात बोलीभाषेवर मालवणीचा प्रभाव दिसतो. त्यामुळे तिथेही दादांच्या कवितांना अधिक पसंती मिळते. पुण्यासह मुंबईत मालवणी कवितांच्या कार्यक्रमाला मोठी मागणी आहे. याला विशेष म्हणजे कवितांचा दादांनी लावलेल्या चाली आहेत. नुकताच त्यांच्या “याद तेची येता माका” या मालवणी गीताला “मराठी म्युझिक इंडीक अवॉर्ड” घोषित करण्यात आला असून सर्वोत्कृष्ट मालवणी गीतकार म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे.

दादांच्या कवीतांतून कोकणची लोकसंस्कृती, सणवार, परंपरा, लोककला आणि कोकणचा निसर्ग प्रतिबिंबित होते. इथल्या निसर्गावर त्यांनी भर दिला आहे. कोकणात येणाऱ्या व कोकणी माणसाच्या मनातील भावना कवितेतून व्यक्त केल्या आहेत. कोकणी माणसाची कोकणाशी जोडलेली नाळ, इथले फणस, आंबे, काजू त्यांनी साहित्य रूपाने मांडला आहे. 'हिरवो माझो गाव' या कवितेत त्यांच्या दृष्टीतलं कोकण मांडलं आहे‌. दादांनी लावलेल्या चाली या विशेष असतात. त्यामुळे त्यांना अधिक दाद मिळते. दादांच्या तारिया मामा, जत्रा, माझं गाव, आबोलेचो वळेसार, शिमगो, पयलो पावस, शालग्या आदी  कविता कोकणवासियांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. तिन्ही कविता संग्रहात विविध परिस्थितीवर कविता आहेत. दादांना भावलेली कविता 'चांन्याची फुला' हीच आहे.  कवितांना चाली दिल्यामुळे लोकांच्या मनापर्यंत पोहचण्यात ते यशस्वी ठरले. हिंदी-मराठी सिनेमा, शालेय कवितांच्या चाली मालवणी कवितांना दिल्यानं त्या श्रोत्यांना आवडल्या. संगीत रसिक असल्याचा फायदा त्यांना अधिक झाला. केदार रागात मालवणी कविता म्हणत असल्यानं त्या श्रोत्यांना अधिक भावतात. त्यात साहित्य निर्मिती करताना त्यांनी मालवणी शिव्या आपल्या लेखनात येऊ दिल्या नाहीत. त्यामुळे सगळ्यांसमोर सादर करता येईल असा कार्यक्रम ते करतात.यासह मालवणीतील जे शब्द कालबाह्य होत आहेत असे शब्द जपून ठेवण्याच काम त्यांनी केलं आहे‌. यावर त्यांची भुमिका स्पष्ट आहे. ते म्हणतात, अनेक इंग्रजी शब्द बोलीत आल्यानं अस्सल मालवणी शब्द वापरले जात नाहीत. मी एकट्यानं काहीतरी केलं म्हणून हे बदलणार नाही. मात्र, मालवणी शब्द टिकून रहावे यासाठी मी शब्द संचय केला आहे. मराठीतून त्याच भाषांतर केल आहे. त्यामुळे कुणालाही ते सहज समजू शकतात. 'सांगल्यापेक्षा केल्ला बरा‌..!' या भावनेतून लिहीत राहिलो, अशी भावना दादांची आहे. 

 

आपल्या प्रदीर्घ अनुभवातून दादांनी दिलेला सल्ला हाच आहे की, मालवणीला बरे दिवस आले आहेत. परंतु, आमच्याकडे कलाकारांना व्यासपीठ मिळत नाही. एकांकिका स्पर्धा होत नाहीत. नाटक, एकांकिकांचा सराव करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. या गोष्टी होणं आवश्यक आहे. राज्यकर्त्यांनी याकडे थोडं लक्ष द्यावं. युवा शक्तीचा वापर करून घेतला पाहिजे. नव्या पिढीला बोली भाषेत प्रचंड रस आहे. आपला माणूस मुळातच हुशार आहे. फक्त, त्याला दिशा दिली पाहिजे. आताच्या पिढीला आपल्या भाषेचं वैभव दाखवलं पाहिजे. त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. नव्या पिढीला बोली भाषेत प्रचंड रस आहे, आवड आहे. आपण ती ओळखली पाहिजे असं त्यांचं स्पष्ट मत आहे. दादांचं चौथं पुस्तक 'सुर्गेंचो वळेसार' वाचकांच्या भेटीला येत असून नव्या गोष्टी यात वाचायला मिळणार आहेत. एवढंच नव्हे तर तबलावादक किशोर सावंत आणि हार्मोनियम वादक निलेश मेस्त्रींच्या साथीनं विविध कार्यक्रमातून त्या ऐकण्यासाठीही मिळणार आहेत. मुंबई येथे सोमवारी २६ मे रोजी मंत्री अँड. शेलार यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. या काव्यसंग्रहातून निश्चितच मालवणी बोली, मालवणी माती अन् मालवणी संस्कृतीचा काव्य सुगंध सातासमुद्रापार दरवळला जाणार आहे. मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या मालवणी मुलूखातील या दादा माणसाला मानाचा मुजरा...!