सिंधुदुर्गच्या पर्यटन आणि खाद्यसंस्कृतीला 'सिलेंडर'चा विळखा

हॉटेल व्यावसायिक अन् छोटे विक्रेते संकटात!
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: March 11, 2026 11:22 AM
views 115  views

कुडाळ : कोकणची शान असलेली मालवणी खाद्यसंस्कृती आणि पर्यटन सध्या एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. मे महिन्याच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पर्यटकांची पावले वळू लागली असतानाच, अचानक निर्माण झालेली सिलेंडर टंचाई आणि पुरवठा बंदी ही हॉटेल व्यावसायिकांसाठी 'धोक्याची घंटा' ठरत आहे. यामुळे केवळ मोठे हॉटेल मालकच नव्हे, तर रस्त्यावरील वडापाव विक्रेते आणि चहावाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही गंभीर झाला आहे.

पर्यटनाच्या हंगामातच 'चुली' विझण्याची भीती

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने मे महिन्यापर्यंत येथे पर्यटकांची अलोट गर्दी असते. समुद्रकिनारे आणि गड-किल्ल्यांच्या दर्शनासोबतच 'मालवणी जेवण' हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. मात्र, कालपासून सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने या व्यवसायाला मोठा ब्रेक लागला आहे.

छोट्या विक्रेत्यांच्या पोटावर पाय

रस्त्याच्या कडेला वडापाव, भजी, पॅटीस आणि समोसे विकून दिवसाला ५०० ते १५०० रुपये कमावणारा सामान्य विक्रेता आज हवालदिल झाला आहे. चहा विक्रेत्यांपासून ते नाश्त्याच्या गाड्या चालवणाऱ्यांपर्यंत प्रत्येकाची गुंतवणूक ही रोजच्या कमाईवर अवलंबून असते. "युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच महागाईने कंबरडे मोडले असताना, आता हक्काचे इंधन (सिलेंडर) न मिळाल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा?" असा आर्त सवाल हे छोटे व्यावसायिक विचारत आहेत.

आर्थिक साखळी विस्कळीत होण्याचा धोका

हॉटेल व्यवसाय हा एकट्याचा व्यवसाय नसून ती एक मोठी आर्थिक शृंखला आहे. जर हॉटेल किंवा खाद्य स्टॉल्स बंद झाले, तर त्याचा थेट परिणाम खालील घटकांवर होणार आहे:

शेतकरी आणि भाजी विक्रेते: भाज्यांची खरेदी थांबणार.

पोल्ट्री व्यावसायिक: अंडी, चिकन आणि मटण विक्रीवर परिणाम.

स्थानिक व्यापारी: तेल, किराणा आणि पॅकेजिंग मटेरियलची मागणी घटणार.

बेरोजगारीची टांगती तलवार

जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायावर हजारो कुटुंबे अवलंबून आहेत. आचारी, वेटर, साफसफाई कामगार आणि मॅनेजर अशा असंख्य पदांवर काम करणारे तरुण आता बेरोजगार होण्याच्या वाटेवर आहेत. सरकारने एकीकडे 'उद्योजक व्हा' असा नारा दिला असला, तरी सध्याच्या या परिस्थितीमुळे उभे राहिलेले छोटे उद्योजकच बुडणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

"पर्यटन हंगामाच्या तोंडावर आलेले हे संकट केवळ हॉटेलमालकांचे नसून संपूर्ण जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचे आहे. प्रशासनाने तातडीने यावर तोडगा न काढल्यास जिल्ह्यातील खाद्यसंस्कृती आणि सेवा क्षेत्र पूर्णपणे कोलमडून पडेल."