बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळाची तीव्रता वाढली | मान्सूनवर काय होणार परिणाम..?

Edited by:
Published on: May 26, 2024 14:09 PM
views 57  views

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात रेमल चक्रीवादळ घोंघावत असून त्याची तीव्रता वाढली आहे. हे एक सीव्हियर सायक्लॉनिकक स्टॉर्म बनलं असून 26 मेच्या रात्री बांग्लादशातील खेपुपुरा आणि पश्चिम बंगालमधलं सागर बेट आणि आपसपासच्या प्रदेशात किनाऱ्याला धडकेल अशी शक्यता आहे. किनाऱ्यावर थडकल्यावर त्याची तीव्रता कमी होईल आणि हे वादळ थोडंसं पूर्वेला वळून बांग्लादेशात आणि तिथून पुढे ईशान्य भारतातील काही राज्यांत जाईल. त्यामुळे पश्चिम बंगालचा दक्षिणेकडील म्हणजे गंगेच्या मुखाजवळचा भाग, कोलकाता, आसाम, मेघालय इथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. इथे पुढच्या काही दिवसांत 204 मिलीमीटरहून जास्त पावसाची शक्यता आहे, तर अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम आणि मणिपूरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या चक्रीवादळादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 110-120 किलोमीटर एवढा राहील. तर काही झोत ताशी 135 किलोमीटरपर्यंत वेगानं वाहतील, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नाही. पण मान्सूनच्या वाटचालीवर याचा प्रभाव पडल्याचं दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरातली मान्सूनची शाखा आणखी पुढे सरकली आहे. या उपसागराच बहुतांश भाग आता चक्रीवादल आणि मान्सूनच्या ढगांनी व्यापला आहे.*

तर अरबी समुद्रातली मान्सूनची शाखा अजून फार वर सरकलेली नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार इथे केरळमध्ये 31 तारखेच्या आसपास मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता आहे.