साहित्यातून रुजतात संस्कार !

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरज चौगुले यांचा विश्वास
Edited by: संदीप देसाई
Published on: December 22, 2023 10:20 AM
views 55  views

दोडामार्ग : साहित्यातून मनावर चांगले संस्कार होतात. साहित्य आपणाला जगायला शिकवित, साहित्य आपल्या प्रश्नांची जाणीव करून देत असते असे प्रतिपादन करत कुमार साहित्य संमेलनातून भावी प्रतिभावंत साहित्यिक घडतील असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सूरज चौगुले यांनी व्यक्त केला. धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेतर्फे १५ वे नवा विद्यार्थी कुमार साहित्य संमेलन पिकुळे येथील श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. 

या कुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्था कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरस्कर, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, माजी संचालक प्रकाश गवस, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरज चौगुले, उद्योजक विवेकानंद नाईक, संस्थाध्यक्ष कल्पना तोरस्कर, खजिनदार वैभव नाईक, समन्वय समिती सचिव रश्मी तोरस्कर, सह सचिव नंदकुमार नाईक, मालवणी कवी दादा मडकईकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, शिवसेना तालुका अध्यक्ष गणेशप्रसाद गवस, पिकुळे सरपंच आपा गवस, झरेबांबर आंबेली सरपंच अनिल शेटकर, पिकुळे माजी सरपंच रामचंद्र गवस, निवृत्त मुख्याध्यापक कैलास जाधव, प्रशालेच्या मुख्याध्यापिका स्नेहल गवस, कार्यकारी संपादक प्रमोद सावंत, उपकार्यकारी संपादक अनिल मगदूम उपस्थित होते. 

यावेळी बोलताना ॲड. रमाकांत खलप म्हणाले, संस्थेचे कार्याध्यक्ष कै. आबासाहेब तोरस्कर यांनी संस्थेच्या प्रशालांमधून भावी साहित्यिक निर्माण व्हावेत या हेतूने कुमार साहित्य संमेलन सुरू केले. नवा विद्यार्थी अंकातून दरवर्षी विद्यार्थ्यांना नवनवीन लेख, कथा, कविता लिहिण्याची संधी उपलब्ध करून दिली. 'अन्नेन क्षणिका तृप्ती: यावज्जीवंच विद्यया' या श्लोक प्रमाणे अन्न माणसाची क्षणिक भूक भागविते. मात्र विद्या मनाला निरंतर समाधान देते. हे विद्यार्थ्यांनी कायम लक्षात ठेवावे, असे आवाहन केले.
   
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी, शिक्षण हा सर्वांगीण विकासाचा पाया आहे. विद्यार्थ्यांची मातृभाषा समृद्ध असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समृद्ध शिक्षण मिळावे यासाठी कै. आबासाहेब तोरस्करांनी ग्रामीण भागात शाळा सुरू केल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची गावातच दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध झाली. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नवा विद्यार्थी, कुमार साहित्य संमेलन यासारखे उपक्रम राबविले. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात शैक्षणिक संस्थांचा सहभाग मोठा असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योजक व ज्येष्ठ विचारवंत विवेकानंद नाईक म्हणाले की, अन्य प्राण्यांचा विचार करता मनुष्याला परमेश्वराने विचारांची ताकद दिली आहे. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी वाचनावर भर दिला पाहिजे.  वाचनातून अधिकाधिक ज्ञान संपादन करून घ्या. नवा विद्यार्थी अंकातून विद्यार्थ्यांनी लेखन संधीचा फायदा करून घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी डॉ. मिलिंद तोरस्कर, प्रकाश गवस, कैलास जाधव यांनी मनोगते व्यक्त केली.
      
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परेश देसाई व अमित कर्पे यांनी केले. उपस्थितांचे आभार संस्था सहसचिव नंदकुमार नाईक यांनी मानले. सायंकाळच्या सत्रात मालवणी कवी दादा मडकईकर यांनी एकापेक्षा एक सरस कविता सादर करून विद्यार्थी व साहित्यप्रेमींची मने जिंकली. साहित्य संमेलनास विद्यार्थ्यांसह साहित्यप्रेमी, शिक्षक, पिकुळेतील गावकरी या मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.