
रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयातील क्रस्ना डायग्नोस्टिक्सने १५ सप्टेंबरपासून सी.टी.स्कॅन सेवा तात्पुरती बंद केली आहे. उपजिल्हा रुग्णालयातील या सेवेची ७१ लाख ६५ हजार ०२९.६ रुपयांची देयके वरिष्ठ कार्यालयाकडून अद्यापही न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती क्रस्ना डायग्नोस्टिक्सने वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना पत्र देऊन कळवली आहे. डॉ. ऐवळे यांनी या पत्राची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना दिली आहे.
आता पर्यंत ३ वेळा देयक थकल्याने सेवा बंद केल्याचे प्रकार आहेत. दिवसाला किमान ५० सीटीस्कॅन येथे होत असतात.
या गैरसोईमुळे अनेक गरजू रुग्णांचे हाल होणार आहेत. सरकारी रुग्णालयात ही सेवा मोफत उपलब्ध असल्याने सामान्य नागरिकांना मोठा आधार होता. ही सेवा बंद झाल्यामुळे आता रुग्णांना खासगी ठिकाणी जावे लागेल, जिथे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. याआधीही या कंपनीचे पेमेंट थकल्यामुळे सेवा बंद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे, स्थानिक नागरिकांनी शासनाच्या या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला असून असे 'खेळ' थांबवण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, याबाबत विचारण्यासाठी क्रस्ना डायग्नोस्टिक्सला फोन केले असता त्यांनी फोन स्वीकारले नाहीत. त्यांच्या वरिष्ठ कार्यालयातूनही प्रतिसाद मिळाला नाही. तर उपजिल्हा रुग्णालयातील कार्यालय बंद असल्याने तिथे कोणीही दिसून आले नाही. याबाबत वैद्यकीय अधिक्षक डॉ. ऐवळे यांना विचारले असता, आपणाला याबाबत संबंधितांनी माहिती दिली असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांना याबाबतची माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले.