
देवगड : देवगड येथील विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक उलाढालीत वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या शाळा, महाविद्यालयांना सुटी पडल्याबरोबर तालुक्यातील उन्हाळी पर्यटन बहरले आहे. वैशाख वणव्यामध्ये नागरिकांना दिवसभर होरपळून काढणारा सूर्यनारायण सायंकाळच्यावेळी समुद्रात डुबताना पाहण्यासाठी पर्यटकांची समुद्रकिनारी गर्दी वाढत आहे. समुद्राच्या पाण्यात मनमोहक डुंबून आनंद घेण्यावर पर्यटकांचा अधिक भर असतो.
तालुक्यातील किल्ले विजयदुर्गसह श्री क्षेत्र कुणकेश्वर दर्शनासाठीही भाविकांची मोठी गर्दी जाणवते. किनारपट्टी भागातून फिरण्याचा पर्यटकांना मोह आवरत नसल्याचेही दिसते. शालेय सुट्टी आणि सलग शासकीय सुट्यांमुळे येथील पर्यटनामध्ये वाढ होताना दिसते. विशेषतः पर्यटकांचा ओढा किनारपट्टी भागाकडे अधिक असल्याचे जाणवते. स्वच्छ समुद्रकिनारे, पराक्रमाची गाथा सांगणारे गडकिल्ले पर्यटकांना अधिक आकर्षित करतात. सायंकाळच्यावेळी बहुतांशी सर्वच ठिकाणच्या समुद्रकिनारी वर्दळ जाणवते. यामध्ये स्थानिकांसह पर्यटक तसेच पाहुणे मंडळीची गर्दी दिसते.
दिवसभर वैशाख वणव्यामुळे नागरिक हैराण असतात. मात्र, सायंकाळी उकाड्याचा क्षीण घालवण्यासाठी पर्यटकांची समुद्रकिनाऱ्याला पसंती असते. येथील पवनचक्की भागात तसेच समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी वाढताना दिसत आहे. त्यातच तारामुंबरी- मिठमुंबरी पुलावरून खासगी वाहनाने पर्यटकांची येजा सुरू असते. तेथील समुद्रकिनारी पर्यटकांची वर्दळ जाणवते. श्री क्षेत्र कुणकेश्वर, किल्ले विजयदुर्ग येथेही पर्यटकांची वर्दळ दिसते. पर्यटक बरेचदा खासगी वाहने घेऊन येत असल्याने पसंतीच्या ठिकाणी थांबतात. पर्यटनामुळे हॉटेल व्यवसाय तेजीत असून वर्दळीतही वाढ झाल्याचे चित्र आहे. समुद्रकिनाऱ्यासह धार्मिक पर्यटनाकडेही पर्यटकांचा ओढा असतो.