
कुडाळ : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम त्वरित मिळावी आणि त्यांची खावटी व शेती कर्जे माफ व्हावीत, या प्रमुख मागण्यांसाठी ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'ढोल बजाव, कृषी मंत्री हटाव' नावाने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे.
पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे विमा काढलेला असून पण त्यांना कोणताही परतावा न मिळाल्याने संबंधित विमा कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे. सतीश सावंत यांनी सांगितले की, नियमानुसार, शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम ३० जूनपर्यंत जमा होणे गरजेचे असताना, आजपर्यंत एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन सतीश परब यांनी केले आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम खात्यात जमा न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले : वैभव नाईक
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक यांनी विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा आणि काजू ही प्रमुख फळ पिके आहेत. जून-जुलैपर्यंत शेतकऱ्याला विम्याची रक्कम मिळणे अपेक्षित असते, कारण याच पैशातून शेतकरी खते, अवजारे आणि शेतीसाठी लागणारे आवश्यक साहित्य खरेदी करतो.
१२५ कोटींपेक्षा जास्त पीक विम्याची रक्कम कंपनीकडे थकीत आहे. विमा कंपनीला ब्लॅक लिस्ट केल्यामुळे ही रक्कम आता मिळणार की नाही, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे नाईक म्हणाले.
या आंदोलना संदर्भात माहितीसाठी एमआयडीसी, कुडाळ येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, अमरसेन सावंत, अतुल बंगे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.










