
कुडाळ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (NH 66) क्रॉस करून चक्क बिबवणे पुलाच्या पलीकडे सर्व्हिस रोडवर आलेल्या एका मगरीचा कुडाळ वन विभागाच्या पथकाने आज यशस्वीरित्या बचाव केला. अचानक रस्त्यावर महाकाय मगर दिसल्याने या भागात नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांना बिबवणे पुलाजवळ सर्व्हिस रोडवर मगर दिसताच त्यांनी तत्काळ वन विभागाला याची माहिती दिली. घटनेची गांवाभीर्य लक्षात घेऊन कुडाळ वन विभागाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली.
या मगरीला सुरक्षितपणे पकडण्याचे आणि नागरिकांचे भय दूर करण्याचे मोठे आव्हान वन विभागासमोर होते. वन विभागाने अत्यंत नियोजनबद्ध आणि कौशल्याने मगरीला पकडण्याची कार्यवाही सुरू केली. अखेर, वन विभागाने या मगरीला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात यश मिळवले. मगरीला पकडल्यानंतर वन विभागाने तिला सुरक्षित अधिवासात सोडण्याची व्यवस्था केली.
सदर रेस्क्यू ऑपरेशन उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा आणि सहा. वनसंरक्षक डॉ. सुनील लाड, वनक्षेत्रपाल संदीप कुंभार सर, वनपाल सूर्यकांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. रेस्क्यू यशस्वी करण्यात वाहन चालक कमलेश वेंगुर्लेकर, RRT टीम सदस्य अनिल गावडे, दिवाकर बांबरर्डेकर, सुशांत करंगुटकर, वैभव अमरुस्कर, प्रसाद गावडे आणि पोलीस कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या या प्रयत्नांमुळे एक मोठी दुर्घटना टळली. वन विभागाच्या तत्परतेमुळे मगरीचा आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न तात्काळ मार्गी लागला आहे.











