कोनाळ मतदार संघात अपक्ष उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी..?

Edited by: लवू परब
Published on: January 31, 2026 10:49 AM
views 76  views

दोडामार्ग : पंचायत समिती कोनाळ मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असून प्रचारादरम्यान गुरुवारी रात्रौच्या सुमारास मुळस ख्रिश्चनवाडी येथे अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार अपक्ष उमेदवार साक्षी देसाई यांनी दिली आहे. त्या फिर्यादीवरून शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, शिवसेना तालुका संघटक गोपाळ गवस, स्वप्नील निंबाळकर, सचिन देसाई यांच्या यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत साक्षी देसाई यांनी म्हटले आहे की, आपण पंचायत समिती कोनाळ मतदारसंघातून पक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावागावात जाऊन भेटीगाटी घेण्याचे काम चालू आहे. त्याच धर्तीवर गुरुवारी रात्री काही कार्यकर्ते मुळस ख्रिश्चनवाडी येथे मीटिंग साठी एकत्र जमलो होतो. तेथे चर्चा विनिमय करून घरी जाण्यासाठी निघालो होतो. मुख्य रस्त्यावर येण्यासाठी ख्रिश्चनवाडी येथून निघालो असता समोरून गोवा पासिंगची कार आमच्या गाडीसमोर आणून लावली. त्या कारमधून स्वप्निल निंबाळकर, राजेंद्र निंबाळकर, सचिन देसाई, गोपाळ गवस हे खाली उतरले. रस्ता अडवून आमच्या चार चाकी समोर उभे राहिले. यावेळी राजेंद्र निंबाळकर यांनी आमच्या गाडीत असलेल्या प्रवीण गवस यांना उद्देशून मनात लज्जा निर्माण करणारे शब्द उच्चारले. आपल्या विरोधात निवडणूक लढविण्याची तुमची हिम्मत कशी झाली? आमच्या विरोधात प्रचारासाठी फिरत असला तर तुम्हाला एका-एकाला मारणार अशी धमकी त्यांनी दिली. सुरेश दळवी यांनी सुद्धा आमच्या विरोधात निवडणूक लढविली होती, त्यांना आम्ही पुरून उरलो. त्यांच्यावर पण एफआयआर दाखल केली होती म्हणून धमकी देत होते. याचवेळी गोपाळ गवस यांनी तेथे असलेल्या जंगली लाकडाचा दांडा उचलून कोणाला तरी फोन लावला आणि तुम्ही इकडे या, यांचा गेम करायचा आहे अशा शब्दात फोनवर बोलले. त्यांच्यासोबत असलेले सचिन देसाई यांनी सुद्धा आम्हाला शिवीगाळ केली. यावेळी एक तास आम्हाला रस्त्यात अडवून ठेवले. हे चालू असतानाच आमच्यासोबत असलेले स्वप्निल देसाई यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. हा सगळा प्रकार पाहता आमच्या सोबत असलेले प्रवीण गवस यांनी बाजूला असलेल्या एका घरात आम्हाला सुरक्षित नेले. त्या घरातल्या व्यक्तींनी एका पायवाटेने मला मुख्य रस्त्यावर नेऊन सोडले. तद्नंतर स्वप्निल देसाई यांनी आपली कार आणली व मला नेऊन घरी सोडले अशी फिर्याद अपक्ष उमेदवार साक्षी देसाई यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात दिली.  त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र निंबाळकर, स्वप्निल निंबाळकर, गोपाळ गवस, सचिन देसाई यांच्यावर भारतीय न्यायसंहिता १२६, ७९, ३५१(२), ३५१(३), १७४, ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.