CRIME | सपोनि पडेलकर यांची गाडी अडवली | वीरेंद्र जाधवविरोधात गुन्हा दाखल

संशयित जाधव पडेलकर यांचा अधून-मधून करत होता पाठलाग
Edited by: प्रतिनिधी
Published on: February 28, 2023 20:20 PM
views 389  views

देवगड : देवगड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप शंकर पडेलकर यांची दुचाकी अडवून त्यांना दमदाटी केल्याप्रकरणी वाडा येथील वीरेंद्र जाधव (५२) या संशयिताविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी १०.४० वा. च्या सुमारास वाडातर पुलानजीक कांबळे यांच्या दुकानासमोर घडली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित जाधव हा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पडेलकर यांचा अधून-मधून पाठलाग करीत असे. श्री. पडेलकर हे ड्यूटी संपवून घरी जात असताना संशयित जाधव हा कावलेवाडी येथे कालवे खरेदी करताना त्यांना दिसला. त्याने आपली दुचाकी रस्त्यात अडथळा निर्माण होईल. अशारितीने उभी करून ठेवली असल्याने ती दुचाकी बाजूला घेण्यास सांगून श्री. पडेलकर पुढे निघून गेले. त्यानंतर वाडातर पुलानजीक कांबळे यांच्या दुकानासमोर श्री. पडेलकर यांची दुचाकी संशयित जाधव याने अडवून 'तुम्ही माझी गाडी का तपासता. तुम्ही यापुढे माझी गाडी तपासायची नाही, अशी दमदाटी केली.


याबाबतची तक्रार श्री. पडेलकर यांनी देवगड पोलीस स्थानकात दाखल केली आहे. त्यानुसार संशयित बीरेंद्र जाधव याच्याविरुद्ध भादंवि कलम ३४१. ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास देवगड पोलीस करीत आहेत.