..'या' तालुक्यात भाजपाच्या ११ जणांवर गुन्हे दाखल !

भास्कर जाधव यांच्या विरोधात काढली होती रॅली
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: October 20, 2022 20:22 PM
views 212  views

वैभववाडी : तालुक्यात भारतीय जनता पार्टी पक्षाच्यावतीने बुधवारी आ.भास्कर जाधव यांच्या विरोधात काढलेल्या निषेध रँली प्रकरणी ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांचा मनाई आदेश डावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्ह्यात शिवसेना (उद्धव ठाकरे गट)व भाजपात वाद रंगला आहे. कुडाळ येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत आ.भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे कुटुंबीय तसेच भाजपाच्या नेत्यावर टिका केली होती. आ.श्री जाधव यांच्या टिकेनंतर जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निषेध केला होता. वैभववाडी तालुक्यातही कुत्र्याच्या गळ्यात मी भास्कर जाधव भामटा असा फलक लावण्यात आला होता. याप्रकरणी वैभववाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस हवालदार गणेश भोवड यांनी याबाबत फिर्याद दिली. याप्रकरणी भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी, महिला तालुका अध्यक्ष प्राची तावडे ,युवामोर्चा तालुका अध्यक्ष किशोर दळवी, जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, माजी उपसभापती भालचंद्र साठे, उपनगराध्यक्ष संजय सावंत,माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र राणे,दत्ताराम सावंत, स्वप्नील खानविलकर, दिगंबर उर्फ बंड्या मांजरेकर या ११जणांसह इतर यांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले.याप्रकरणी त्यांच्या भादवी कलम १४३,१४९,महाराष्ट्र पोलीस अँक्ट १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील याचा तपास करीत आहेत.