CRIME | लाच घेताना उपनिरीक्षकासह, हवालदार ACB च्या जाळ्यात !

बलात्काराच्या गुन्ह्याची धमकी | 20 हजाराची लाच घेताना कारवाई
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 20, 2023 19:25 PM
views 1777  views

वैभववाडी : येथील पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक सुरज शिवाजी पाटील (वय ३०) व पोलीस हवालदार मारुती संतराम साखरे वय (३६) यांना २० हजाराची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या सिंधुदुर्ग पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज दुपारी १२.३० वा वैभववाडी पोलीस स्थानकात करण्यात आली. एका तक्रारची तडजोड करण्यासाठी लाच घेताना हे दोघे सापडले. संशयित दोघांवरही गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

     वैभववाडी पोलीस स्थानकात कुसुर येथील आर्थिक देवाणघेवाणीवरुन मारहाणीची तक्रार होती. या चौकशी दरम्यान तक्रारीतील तक्रारदाराविरोधात भादवी ३७६ नुसार गुन्हा दाखल करतो, असं सांगून संशयित दोघांनी ४० हजाराची लाच मागितली होती. तडजोडीअंती ३० हजाराची रक्कम देण्याचे ठरले. त्यातील २० हजाराचा पहीला हप्ता आज देण्याचे तक्रारदार याने मान्य केले होते. याबाबत त्या तक्रारदार याने सिंधुदुर्ग लाचलुचपत विभागाशी यासंदर्भात संपर्क साधला. त्या विभागाने सापळा लावला. लाचलुचपत विभागाच्या सापळ्यानुसार तक्रारदार हा दुपारी १२.३० च्या दरम्यान पोलीस स्थानकात २० हजार रुपये घेऊन आला. यावेळी उपनिरीक्षक सुरज पाटील यांच्या समक्ष हवालदार साखरे यांनी लाचेची ती रक्कम स्वीकारली. त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ दोन्ही आरोपींना पकडले. संशयित दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. तसेच या कारवाईनंतर दोघांच्याही घरांची झडती घेण्यात आली. ही कारवाई सिंधुदुर्ग विभागाच्या पथकाने केली आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील,पो.ह.रेवंडकर, श्री परब, श्री पालकर, श्री.पेडणेकर , श्री पोतनीस यांचा सहभाग होता.