CRIME | प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारी टोळी जेरबंद

चौघांसह 2 बंदूक, 13 काडतुसे, दुचाकी, चारचाकी ताब्यात
Edited by: विनायक गांवस
Published on: April 23, 2023 18:39 PM
views 120  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये अवैद्य अग्नीशस्त्रांचा वापर करुन प्राण्यांची शिकार करुन त्यांच्या अवयवांची विक्री व तस्करी करणाऱ्या इसमांची माहीती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी आदेश दिले होते. सदर आदेशाच्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे वेळोवेळी आढावा घेवून मार्गदर्शन करत होते.


पोलीस निरीक्षक संदिप भोसले,  स्थानिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग यांनी अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करुन सिंधुदुर्ग जिल्हयातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर पाळत ठेवून कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. २३/४/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या अंमलदारांना पंग्रड जंगलात कुडाळ येथील काही इसम कार व मोटार सायकलने जंगली प्राण्यांची शिकार करण्यासाठी गेले असल्याची गोपनीय बातमी मिळाली. त्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक महेंद्र घाग, सहा. पोलीस उप निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलीस हवालदार प्रकाश कदम, अनुपकुमार खंडे, प्रमोद काळसेकर, पोलीस अंमलदार प्रथमेश गावडे, यशवंत आरमारकर यांनी कडावल बाजारपेठेत सापळा रचून सकाळी ५:४५ वा.चे पांग्रडवरुन कुडाळकडे जाणारी एक सफेद कार व एक मोटार सायकल थांबवून तपासणी करुन त्यामधील अजित लाडोबा तांबे ( वय ५५ वर्षे, रा. वक्रतुंड कॉम्पेक्स, कुडाळ ), दत्ताराम संभाजी परब ( वय ५० वर्षे, रा. वक्रतुंड संकुल, लक्षीवाडी, कुडाळ ), सिध्देश सुरेश गावडे ( वय २४ वर्षे, रा. अणसुर, टेंबवाडी, वेंगुर्ला ), नारायण प्रकाश राउळ, ( वय- १९ वर्षे, रा. तेंडोली, खरातवाडी, कुडाळ ) यांच्या ताब्यातून दोन काडतूस बंदूका व १३ जीवंत काडतूसे हस्तगत केली.


कारमधील दोन इसम व मोटार सायकलवरील दोन इसम असे एकूण ४ इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडून १ कार, १ मोटार सायकल, २ काडतूस बंदूका ( ज्यामध्ये १ डबल बॅरल बंदूक व १ सिंगल बॅरल बंदूक), १३ जिवंत काडतूसे व इतर साहीत्य असे मिळून एकूण ६,१४, ०६० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


या इसमांविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ कलम ३,२५ सह कलम ३७ (१), १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास कुडाळ पोलीस करत आहेत.