
सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज घडले नव्हेत तर जाणीवपूर्वक घडविले गेले. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी स्वतः काळाची गरज ओळखून, स्वराज्य निर्मितीसाठी शिवरायांना सर्वगुणसंपन्न बनविले. बाल वयातच माँसाहेब जिजाऊ यांनी छत्रपती शिवरायांना राम, कृष्ण, हनुमान व भीम यांसारख्या शौर्यवान व्यक्तींच्या पराक्रमाच्या गाथा सांगितल्या. म्हणूनच शिवराय पुढील काळात अद्वितीय पराक्रम गाजवू शकले. मात्र अलीकडच्या काळात जिजाऊंसारख्या शौर्य असलेल्या माता हरपल्या. शिवरायांसारखे तेजस्वी बालक घडवायचे असतील तर आम्हाला जिजाऊंसारखे व्यक्तिमत्वही घडविणे क्रमप्राप्त आहे, असे प्रतिपादन सुप्रसिध्द शिवशंभू व्याख्याते प्रा. रूपेश पाटील यांनी आरोंदा येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात केले.
मराठा समाज उत्कर्ष मंडळ, आरोंदा यांच्यातर्फे सालाबादप्रमाणे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रात मराठा समाज तालुकाध्यक्ष तथा वेंगुर्ला
पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश परब यांच्याहस्ते शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अध्यक्षांचे समाज प्रबोधनपर भाषण झाले. तसेच इतर उपस्थित असलेल्या मान्यवरांनीही आपले विचार मांडले.
सायंकाळच्या सत्रात सुप्रसिध्द शिवशंभू व्याख्याते प्रा. रूपेश पाटील यांचे 'शिवसंस्कार - काळाची गरज' या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
प्रा. पाटील यांनी सांगितले की, छत्रपती शिवराय म्हणजे अखंड प्रेरणास्त्रोत आहेत. राष्ट्रमाता जिजाऊ यांनी शिवरायांना मावळ्यांच्या सोबतीने स्वराज्य निर्मितीचा ध्यास लावला. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, संभाजी कावजी, जिवाजी महाला, शिवा काशिद अशा जीवाला जीव देणाऱ्या कितीतरी निष्ठावंतांच्या मैत्रीची कदर कशी करावी? हा संस्कार बालवयातच शिवरायांना दिला. शिवराय घडले नाहीत तर जाणीवपूर्वक घडविले गेलेत. म्हणूनच स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणारे मावळे देखील निर्माण झालेत. ही सारी किमया जिजाऊंचीच होती. मात्र तिला मूर्त स्वरूप शिवरायांनी दिले. मात्र त्याच महाराष्ट्रात अलीकडच्या काळात आपल्या आधुनिक जिजाऊ मात्र मुलाच्या हातात टीव्हीचा रिमोट किंवा मोबाईल देऊन त्याचे बालपण आणि संस्कारक्षम जीवन हरपून टाकत आहेत, अशीही खंत प्रा. रूपेश पाटील यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास मराठा समाजाचे अध्यक्ष सखाराम जामदार, उपाध्यक्ष बबनराव नाईक, सचिव नरेश देऊलकर, ज्येष्ठ मार्गदर्शक भाई देऊलकर, नरहरी नाईक, प्रशांत कोरगावकर, हेमंत नाईक, राजू नाईक, दिलीप नाईक, प्रशांत नाईक, आरोंदा सरपंच गीतांजली वेर्णेकर, उपसरपंच सुभाष नाईक, अपर्णा मयेकर, शिल्पा नाईक, शलाका नाईक, सौ. कोरगावकर, ज्येष्ठ शिक्षक राणेसर असे असंख्य समाज बांधव उपस्थि होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नरेश देऊलकर यांनी केले.