मुंबई - गोवा महामार्गालगतच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

Edited by:
Published on: March 13, 2025 11:14 AM
views 1860  views

सिंधुदुर्गनगरी :  मुंबई गोवा महामार्ग लगत ओरोस येथे वाहतुकीस अडथळा ठरणारा व धोकादायक असलेला ग्रामपंचायत हद्दीतील अब्दुल हमीद सुबराणी यांच्या मालकीचा गादी कारखाना असलेले बांधकाम गुरुवारी जमीन दोस्त झाले. महामार्ग प्राधिकरणाने ही कारवाई पोलीस बंदोबस्तात केली. महामार्गावरील धोकादायक वळणावर अनधिकृत असलेल्या या अवाढव्य बांधकामावर अखेर हातोडा पडला आहे. 

हाय व्होल्टेज मुख्य विद्युत लाईनच्या खाली महामार्गालगत ओरोस बुद्रुक सर्वे नंबर ३७ हिस्सा नंबर ३३ या क्षेत्रामध्ये सुबरानी यांनी हे बेकायदेशीर बांधकाम केले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात गादी कार खाना व फर्निचर व्यवसाय सुरू होता. फर्निचर साठी व गादी कारखान्यात येणाऱ्या ग्राहकांमुळे व  थेट महामार्गावरच वाहन पार्किंग होत असल्यामुळे वळणावरील हे क्षेत्र धोकादायक बनले होते. यापूर्वी महामार्गावर अनेक अपघात झाले होते. याबाबतची तक्रार महामार्ग प्राधिकरण व तहसीलदार यांच्याकडे झाली होती. 

दरम्यान, गुरुवारी पोलीस बंदोबस्तात ही बेकायदेशी इमारत जमीनदोस्त करण्यात आली. या मातीत मोठ्या प्रमाणात फर्निचर व गाद्या भरण्यात आल्या होत्या. ते सर्व सामान बाहेर काढून बेकायदेशीर इमारत तोडण्याचे काम हाती घेण्यात आले. यावेळी महामार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.