
सावंतवाडी : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी बांद्यात होत असलेल्या मोजणी संदर्भात स्थानिक प्रशासनाला माहिती देणे आवश्यक होती. परंतु तसे न करता मोजणी सुरू केली असून ही मोजणी स्थानिक प्रशासनाने रोखली होती. स्थानिक प्रशासन व शेतकऱ्यांना संबंधित प्रकल्पासाठी जमिनी जाणाऱ्या जमीन मालकांना विश्वासात घेऊन चर्चा करावी अशी आमची भूमिका स्थानिक प्रशासनाने ठेवली आहे. आमचा या महामार्गाला विरोध नाही. पण, आम्ही स्थानिक लोकांसोबत आहोत. लवकरच याबाबत विशेष सभेचे आयोजन बांदा ग्रामपंचायतमध्ये करण्यात येईल व नंतरच भूमिका स्पष्ट करणार असे बांदा सरपंच प्रियांका नाईक सांगितले.
या महामार्गासाठी बांदा शहरात संबंधित विभागाकडून कोणतीही कल्पना न देता मोजणी सुरु होती. यानंतर ही मोजणी बांदा सरपंच प्रियांका नाईक,माजी उपसरपंच राजाराम उर्फ बाळू सावंत,माजी सरपंच मंदार कल्याणकर यांनी थांबवली. ही का थांबवली याबाबत बांदा सरपंच प्रियांका नाईक व ग्रामपंचायत सदस्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर,ग्रामपंचायत सदस्य बाळू सा्वत,जावेद खतीब,प्रशांत बांदेकर,साईप्रसाद काणेकर,रत्नाकर आगलावे, रुपाली शिरसाट, शिल्पा परब, रिया येडवे, दीपलक्ष्मी पटेकर, देवल येडवे, रेश्मा सावंत उपस्थित होते.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक म्हणाल्या, हा प्रस्तावित प्रकल्प कोठून जाणार याबाबत काहीच कल्पना नाही. स्थानिक प्रशासन म्हणून बांदा ग्रामपंचायतीला मोजणी करण्यापूर्वी कळविणे क्रमप्राप्त होते. मात्र, असे न करता ती मोजणी त्यांनी सूरू केली होती. म्हणूनच लवकर ग्रामसभा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असे बांदा सरपंच व सदस्य यांनी स्पष्ट केले.