
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून बनावट नोटा वितरित करणारे आणि काही बनावट नोटा बाजारात सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या तपासात रत्नागिरीच्या प्रसाद राणे प्रिंटिंग प्रेसमधूनच बनावट नोटांची छपाई सुरू असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली. या प्रकरणातील प्रिंटिंग प्रेसचा मालक प्रसाद राणेला गुन्हे शाखेने अटक केली. त्यामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली असून अजून किती ठिकाणी बनावट नोटा आहेत याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. गुन्हे शाखेने यापूर्वी शहानवाज शिरलकर, राजेंद्र खेतले, संदीप निवलकर आणि ऋषिकेश निवलकर यांना अटक केली होती. यांच्या चौकशीतून अमित कासारचे नाव समोर आले. त्यालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. यावेळी अधिक तपास करत असताना रत्नागिरीमध्ये राणेची प्रिंटिंग प्रेस आहे. तेथूनच तो बनावट नोटांची छपाई करत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली.