नगरसेवक रोहन खेडेकर अपात्रच | आयुक्तांनी अपील फेटाळले

Edited by: नागेश दुखंडे
Published on: October 06, 2023 19:27 PM
views 492  views

देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायतीचे शिवसेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांना नगरसेवक असताना नियमबाह्य केलेल्या बांधकाम प्रकरणी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी मंजूलक्ष्मी यांनी नगरसेवक म्हणून राहण्यास अपात्र ठरवले होते. याबाबत त्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील सादर केले होते. हा अपील अमान्य होऊन नगरसेवक रोहन खेडेकर यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. ही तक्रार मान्य करून खेडेकर यांना नगरसेवक म्हणून राहण्यास अपात्र ठरविण्यात आले होते. याबाबत खेडेकर यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केला होता. मात्र, हे अपील फेटाळला असून सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम केला आहे.

विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निकालात म्हटले आहे, की अपिलंट यांचे अपिल नामंजुर करण्यात येत आहे.जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिलेला दि.१७/०७/२०२३ चा आदेश कायम करण्यात येत आहे.अपिलंट यांना देवगड-जामसंडे नगरपंचायत प्रभाग क्र. ७. चे नगरसेवकपदी कायम ठेवण्याचे अमान्य करण्यात येत आहे. योगेश चांदोस्कर यांच्या तर्फे अॅड. सुधीर प्रभू यांनी कामकाज बघितले.