शिवराज्याभिषेक हा भारतीय इतिहासातील सोनेरी क्षण

शिवव्याख्याते अँड शिवाजी देसाई यांचे हनुमंत गडावर प्रतिपादन
Edited by: संदीप देसाई
Published on: June 07, 2023 20:06 PM
views 87  views

दोडामार्ग : छत्रपती शिवराय हे विलक्षण दूरदृष्टी असणारे राजे होते आणि त्यांना ही दूरदृष्टी त्यांच्या बालपणापासूनच लाभली होती. त्यांनी त्यांच्या बालपणात पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न वयाच्या ४४ व्या वर्षी पूर्ण केले आणि शिवराज्याभिषेक संपन्न झाला. शिवराज्य भिषेक हा भारतीय इतिहासातील सोनेरी क्षण होता कारण ह्या क्षणामुळे भारतीय इतिहासाला वेगळी कलाटणी मिळाली असे प्रतिपादन गोव्यातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते अँड शिवाजी देसाई यांनी केलं. दोडामार्ग तालुक्यातील फुकेरी गावातील ऐतिहासिक हनुमंत गडावरील ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त  सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रदीप भिंनताडे, चंद्रकांत वाघेरे, संदिप गवस आदी मान्यवर उपस्थित होते.

अँड शिवाजी देसाई पुढे म्हणाले की शिवरायांनी स्वतः १११ किल्ले बांधले. राज्याभिषेकावेळी ३६० पेक्षा अधिक किल्ले स्वराज्यात होते.आज ह्या शिवकालीन किल्ल्यांचे रक्षण आणि संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. कारण आपल्या इतिहासातील मराठ्यांनी केलेल्या पराक्रमाची साक्ष हे किल्ले देत आहेत. आज खरे म्हणजे सह्याद्री प्रतिष्ठान चे सर्व सदस्य आणि महाराष्ट्रातील सर्व दुर्गवीर अभिनंदनास पात्र आहेत. कारण ह्या दुर्ग विरांमुळे आज गडकिल्ल्यांचे अस्थित्व टिकून आहे. शिवरायांच्या काळात हे गडकिल्ले बांधणे सोपे अजिबात नव्हते. हे गड किल्ले बांधणारे आपले मावळे हे आरोग्याने सक्षम होते. गड किल्ल्यांचा प्रत्येक दगड आज पराक्रमाची साक्ष देत आहे.म्हणून हे गडकिल्ले आपण आपल्या लहान मुलांना, युवकांना दाखविले पाहिजेत. जेणेकरून त्यांना पराक्रम आणि सामर्थ्याची जाणिव होईल.

फुकेरी गावातील श्री हनुमंत गडावर सर्व अडचणी पार करून शिवरायांच्या मूर्तीची  प्रतिष्ठपना होणे ही गोष्ट गौरवास्पद आहे. या गावाच्या तरुणांनी आणि महाराष्ट्रातील तमाम दुर्ग वीरांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखविली आणि एका नवीन इतिहासाची निर्मिती केली. म्हणून ह्या दुर्गविरांच्या मागे आपण खंबीर पणे उभे राहायला पाहिजे. त्यांना प्रोत्साहन देऊन शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर आपण दिली पाहिजे. कारण खऱ्या अर्थाने हे दुर्ग विर शिव विचार सर्वत्र पोहचवत आहेत. आणि तो पोहचविणे ही काळाची गरज आहे. कारण शिवरायांनी गीतेच्या अठराव्या अध्याया नुसार कर्म प्राधानता  जोपासली, प्रजेमध्ये विश्वास निर्माण केला आणि असंख्य अडचणींवर मात करून स्वराज्य उभे केले असे अँड देसाई शेवटी म्हणाले.

यावेळी प्रदीप भिनताडे, संदीप गवस यांनी विचार मांडले. याप्रसंगी शाल, श्रीफळ देऊन सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने अँड शिवाजी देसाई, प्रदीप भिंनताडे, संदीप गवस, सौ .प्रियदर्शिनी शिवाजी देसाई, तसेच दुर्ग वीरांचा गौरव करण्यात आला. यावेळी वेष भूषा स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात शिव पूजनाने झाली.सूत्र निवेदन आणि आभार प्रदर्शन सिद्धेश परब यांनी केले.