
सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये दुसरी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ मोठया उत्साहात पार पडला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० नुसार, हे विद्यार्थी आता पुढील शैक्षणिक टप्प्यांमधे प्रवेश करतील. शाळेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई आणि प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक यांची या समारंभाला विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सहाय्यक शिक्षिका महिमा चारी यांनी प्रास्ताविक करताना हा दीक्षांत समारंभ केवळ शैक्षणिक यशाचा उत्सव नाही, तर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे प्रतीक आहे असे सांगितले.
नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थी पुढील टप्प्यात अजून चांगली कामगिरी करतील आणि समाजासाठी सकारात्मक योगदान देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मुख्याध्यापिका प्रियंका देसाई म्हणाल्या की, नवीन शैक्षणिक धोरण लवचिक असून कौशल्य विकासावर जास्त भर देते. याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची वृत्ती विकसित करणे हा आहे. भोसले इंटरनॅशनल स्कूलचा प्रत्येक विद्यार्थी कुठलेही आव्हान सक्षमपणे पेलू शकतो.
यावेळी दीक्षांत पोशाखात आलेले विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. प्रत्येक विद्यार्थ्याला पालकांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पालकांनीही चांगले शैक्षणिक वातावरण प्रदान केल्याबद्दल शाळेचे आभार मानले. सूत्रसंचालन क्रेसिडा फर्नांडिस, सोनाली शेट्टी व प्रीती डोंगरे तर आभार महिमा चारी यांनी मानले.