
सावंतवाडी : शहरातील गणेश नगर परिसरात गॅस पाईपलाईनसाठी करण्यात आलेल्या खोदकामानंतर रस्ते व्यवस्थित न बुजविल्याने आज सायंकाळी एका कारचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जोपर्यंत खोदण्यात आले रस्ते व्यवस्थित करत नाहीत तोवर पुढील काम करू देऊ नका असे श्री. गोंदावळे यांनी सांगितले.
अपघाताची माहिती मिळताच नगरसेवक अजय गोंदावळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहनातील नागरिकांना सुखरूप बाहेर काढून त्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आलेले रस्ते योग्य पद्धतीने बुजवले जात नसल्यामुळेच अशा प्रकारचे अपघात घडत असल्याचे सांगितले. नगरपालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी व संबंधीत ठेकेदारांना तात्काळ नोटीस देऊन योग्य आदेश काढावेत. एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्ते त्वरित दुरुस्त करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.










