
सावंतवाडी : नगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या पीएफ आणि पगारा संदर्भात प्रांताधिकारी तथा नगरपालिकेचे प्रशासक हेमंत निकम यांच्यासोबत बैठकीत तोडगा काढूनही ऐन गणेशोत्सवामध्ये कर्मचाऱ्यांना पगार दिले गेले नाही. हे लांछनास्पद असून पगार तात्काळ द्या. अन्यथा, आम्हाला पुन्हा जाब विचारावा लागेल असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
सावंतवाडी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या पीएफ आणि पगारा संदर्भात गणेश चतुर्थी पूर्वी संप पुकारला होता. या संदर्भात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करत प्रांताधिकारी तथा नगरपालिकेचे प्रशासक हेमंत निकम यांच्याशी बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांचा पीएफ आणि पगारा संदर्भात तोडगा निघाला होता. चतुर्थीपूर्वी कर्मचाऱ्यांचे पगार होतील असे आश्वासनही श्री निकम यांनी दिले होते. परंतु, ते आश्वासन संबंधित पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून पाळले गेले नसल्याने कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार मिळाला नाही. यासंदर्भात माजी नगराध्यक्ष श्री साळगावकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून चतुर्थीमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना पगार न देणे हे लांच्छनास्पद असून अधिकारी वर्ग संबंधित कर्मचाऱ्यांचे पगार करण्यात अजूनही चाचपडत आहेत. एकूणच त्यांनी प्रांताधिकारी यांनी केलेल्या सूचनांना हलक्यात घेतले असून आम्हाला पुन्हा एकदा प्रशासनाला जाब विचारावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.