गोवरची लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा : डॉ.महेश खलिपे

Edited by: देवयानी वरसकर
Published on: November 17, 2022 20:06 PM
views 250  views

सिंधुदुर्गनगरी : गोवर विषाणूपासून होणारा आजार आहे. गोवर विषाणू रुग्णांच्या खोकल्याव्दारे हवेमार्फत पसरतो व संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वासन संस्थेतून शरीरात प्रवेश करतो. या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरुन न जाता जवळच्या आरोग्य केंद्राची संपर्क साधावा व काळजी घ्यावी, असे आवाहन  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी केले आहे.

गोवरची सर्वसाधारण लक्षणे : ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे,डोळे लाल होणे, गोवरची लक्षणे आहेत. गोवरच्या विषाणूंनी शरीरात  प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी लक्षणे दिसण्यास सुरुवात होतात. सुरुवातीस ताप व खोकला, सर्दी, डोळे लाल होणे यापैकी एक-दोन किंवा तीनही लक्षणे असू शकतात. दोन-चार दिवसानंतर सर्व अंगावर पुरळ येणे, ते कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पसरतात. गोवर झालेल्या रुग्णाच्या शरीरातील अ जीवनसत्वाचे प्रमाणा कमी होते. अ जीवनसत्व कमी झालेल्याने रुग्णाला डोळ्यांचे आजार व अतिसार, न्युमोनिया, मेंदूज्वर, असे आजार होऊ शकतात. गोवर झालेल्या रुग्णास लागोपाठ दोन दिवस अ जीवनसत्वाची मात्रा दिल्यास हे आजार होण्याची शक्यता कमी असते, त्यामुळे वेळीच काळजी घेऊन संभाव्य धोके टाळता येऊ शकतात.

गोवर रोग टाळण्यासाठी लसीकरण प्रभावी मार्ग असून प्रत्येक शासकीय रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध आहे. लसीकरणाच्या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण केल्यास गोवर रोग टाळता येतो. लसीचा पहिला डोस नऊ महिने पूर्ण ते 12 महिने व दुसरा डोस 16 ते 24 महिने या वयोगटात देण्यात येतो. बालकांचे गोवर, रुबेला लसीकरण झाले नसेल त्यांचे लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे.    गोवरची लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची संपर्क साधावा व डॉक्टारांचा सल्ला घ्याव, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.