कुडाळात गांजाचं सेवन ; दोन तरुणांवर कारवाई

Edited by:
Published on: April 10, 2025 11:20 AM
views 1799  views

कुडाळ : कुडाळ शहरातील गारवा बियर शॉपीच्या पलीकडील झाडाच्या आडोशाला मंगळवारी मध्यरात्रीनंतर अंधारात सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या गांजा या अमली पदार्थाचे सेवन करताना दोघा युवकांना पोलिसांनी रंगेहात पकडले. दिनार दिलीप खानविलकर, वय २७ रा. पिंगुळी-सराफदारवाडी आणि वसंत ज्ञानेश्वर पडते, वय २९,  रा. कुडाळ बाजारपेठ गेनू प्रसाद कॉम्प्लेक्स अशी या दोन तरुणांची नावे आहेत. त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारक परिणाम पदार्थ अधिनियम कलम 8 (c) 27 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी फिर्याद पोलीस शिपाई योगेश मांजरेकर यांनी तक्रार दिली. अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

कुडाळ शहरात गांजा व अन्य अमली पदार्थांचे सेवन वाढले असून कुडाळमध्ये विक्री होत असल्याच्या घटना पुढे येत असल्याने पोलिसांनी गस्त वाढवली आहे. मंगळवारी पोलिसांनी दोघा युवकांना संशयास्पदरित्या वावरत असताना ताब्यात घेतले. त्यांनी गांजा सेवन केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. गांजा सेवन केल्याची कबुली पोलिसांना दिली. याप्रकरणी कारवाई करण्यात आली असून चौकशी डीडी माने करीत आहेत.