ग्राहक न्यायालयाचा इन्शुरन्स कंपनीला दंड

गाडीच्या विम्याचे 5 लाख 28 हजार 151 ग्राहकाला देण्याचे आदेश
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 03, 2024 15:27 PM
views 116  views

सिंधुदुर्गनगरी :  ग्राहक न्यायालयाने रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला दंड ठोठावला आहे. ओरोस येथील महेंद्र राजाराम परब यांनी जिल्हा ग्राहक आयोगामध्ये इन्शुरन्स कंपनी विरोधात सन 2022 मध्ये तक्रार दाखल केली होती. श्री. महेंद्र परब यांनी 2021 मध्ये छोटा मालवाहू टेम्पो बँकेकडून कर्ज काढून खरेदी केला होतो. या वाहनाचा विमा इन्शुरन्स कंपनीकडून घेतला होता. या वाहनाची संपूर्ण जोखीम इन्शुरन्स कंपनीने घेतली होती.

 या टेम्पो 2022 मध्ये पूर्णपणे जळाला. सदरची बाब इन्शुरन्स कंपनीला समजूनही इन्शुरन्स कंपनीने विम्याची कोणतीही रक्कम श्री. परब यांना दिली नसलेमुळे श्री. परब यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे केली होती. या सुनावणी प्रकरणी इन्शुरन्स कंपनीने श्री. परब यांना कोणतीही सेवा दिली नसल्याचे तसेच देय सेवेत त्रुटी ठेवल्याचे निदर्शनास आले. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने अंतिम आदेश पारीत करुन इन्शुरन्स कंपनीला गाडीची आय.डी.व्ही. रु. 5 लाख 28 हजार 151 ,द.सा.द.शे. 8.5 टक्के व्याजासह परत करण्याचे तसेच  श्री. परब यांना मानसिक त्रासापोटी रु. 20 हजार  तसेच तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु. 10 हजार देण्याचे आदेश पारीत केले आहेत. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष इंदुमती मलुष्टे, सदस्य योगेश खाडिलकर, सदस्या अर्पिता फणसळकर यांच्यासमोर घेण्यात आली.