वैभववाडीत बांधकाम कामगार नवीन नोंदणी व नुतनीकरण शिबिराला गर्दी

आ. नितेश राणे यांच्या माध्यमातून नोंदणी शिबिराचे आयोजन
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 25, 2024 10:40 AM
views 55  views

वैभववाडी : कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी नवीन नोंदणी व नूतनीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला तालुक्यातील कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा शुभारंभ भाजपा कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, भाजपा कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नारायण सावंत, सरचिटणीस रोहन गुरव, माजी सभापती अरविंद रावराणे, माजी उपसभापती भालचंद्र साठे, वैभववाडी भाजपा महिला अध्यक्ष प्राची तावडे, नगराध्यक्षा नेहा माईणकर, वैभववाडी कामगार मोर्चा अध्यक्ष वासुदेव रावराणे, रितेश सुतार, अंबाजी हुंबे, प्रकाश पाटील, देवानंद पालांडे, नोंदणी प्रतिनिधी यतिन गावडे, भक्ती परब व भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कामगारांची गैरसोय दूर व्हावी यासाठी आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी तालुक्यात मोफत बांधकाम कामगार नवीन नोंदणी नुतणीकरण विशेष शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी अशोक राणे म्हणाले, ज्या कामगारांची नोंदणी राहील, त्यांची नोंदणी तालुक्यामध्ये शिबिर घेऊन पूर्ण केली जाईल. कोणताही कामगार नोंदणी शिवाय वंचित राहणार नाही. याची जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा कामगार मोर्चा घेणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक राणे, नारायण सावंत यांचे वैभववाडी भाजपाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.