
वैभववाडी : महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात दि. २६ नोव्हेंबर हा 'संविधान दिन' व 'डीएलएलई डे' असा संयुक्त कार्यक्रम प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना स्वीकृत करण्यात आली आणि २६ जानेवारी १९५० पासून लागू करण्यात आलेल्या राज्यघटनेच्या उद्देशिकेचे प्रथम सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, उपप्राचार्य प्रा. ए. एम. कांबळे, प्रमुख वक्ते प्रा. एस. एन. पाटील, प्रा. डॉ. आर. एम. गुलदे, आयक्युएसी समन्वयक डॉ. डी. एम. सिरसट, स्टाफ सचिव प्रा.डॉ. बी. डी. इंगवले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डी. एस. बेटकर, डिएलएलई विभाग प्रमुख प्रा. पी. एम. ढेरे, एनएसएस विभागाचे प्रा. राहुल भोसले आदी उपस्थित होते.
यावेळी 'भारतीय संविधानाची वाटचाल व उपयुक्तता' या विषयावर प्रा. डॉ. गुलदे यांनी मार्गदर्शन केले. भारतीय संविधानाची पार्श्वभूमी, भारतीय संविधानाची निर्मिती व संविधानाने नागरिकांना मिळालेले हक्क, अधिकार आणि कर्तव्ये याबाबत प्रा. एस. एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले. भारतीय संविधानाचे स्वरूप आणि व्याप्ती खूप व्यापक आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत देश संविधानावर चालतो. त्या संविधानाचा मान-सन्मान ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. काकडे यांनी सांगितले.
महाविद्यालयातील स्पंदन विभागाच्यावतीने भित्तिपत्रकाचे प्रदर्शन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शांती नदीवर बंधारा बांधण्यात आला.
कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. राहुल भोसले यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. आर. बी. पाटील यांनी केले.
