संविधान जागर यात्रा ; कणकवलीत ११ ऑगस्टला सभा

Edited by: साहिल बागवे
Published on: August 10, 2024 13:18 PM
views 157  views

कणकवली : संविधान बदलणार असा अपप्रचार करून दिशाभूल करणाऱ्या व्यवस्थेला उघडे पाडण्यासाठी आणि संविधानाचे प्रबोधन करण्यासाठी कणकवलीत ११ ऑगस्टला रोजी  १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संविधान जागर सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संविधार जागर समितीच्यावतीने नामदेव जाधव यांनी दिली.

   महाराष्ट्र राज्यातील फुले - शाहू - आंबेडकरी व अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांवर कार्यरत सुमारे २५०संघटना, संस्था व मंडळे यांनी एकत्र येऊन अनेक बैठकाद्वारे चिंतन करून "संविधान जागर समिती, महाराष्ट्र" ची स्थापना केली आहे. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त "सत्याग्रही भूमी महाड ते चैत्यभूमी - दादर मुंबई" अशी "संविधान जागर यात्रा २०२४" शुक्रवार दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी ऑगस्ट क्रांती दिनी सुरु झाली आहे. ही यात्रा कणकवलीत ११ ऑगस्ट ला येणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संविधान प्रबोधन सभा १० वाजता होईल , त्याला अनुसुचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष , ॲडव्होकेट वाल्मीक निकाळजे , माजी मंत्री राजकुमार बडोले , कोकण समन्वयक नितीन मोरे ,हे संविधान प्रबोधनात्मक मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भाजपा अनुसुचित जाती जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव यांनी दिली. 

कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अनुसुचित जाती मोर्चा उपाध्यक्ष अशोक कांबळे, सरचिटनीस सुशील कदम, जिल्हा चिटणीस राजेंद्र चव्हाण, मंडल अध्यक्ष अजित तांबे, सुंदर जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

या "संविधान जागर यात्रेस" भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सर्व घटक पक्ष यांचा संपूर्ण व सक्रिय पाठिंबा आहे. या "संविधान जागर यात्रेस" फुले-शाहू-आंबेडकरी व अण्णा भाऊ विचाराचे व आदिवासी, भटके, विमुक्त, समाजाचे आणि राज्यातील सर्व समाजाचे आदरणीय बौद्ध भिक्खू गण, विचारवंत, लेखक, साहित्यिक, प्राध्यापक, वकील, इंजिनियर, तंत्रज्ञ, व्यापारी, उद्योजक यांचा सहभाग असणार आहे. कणकवली येथील आयोजित संविधान जागर यात्रेनिमित्त आयोजित सभेसाठी आ. नितेश राणे यांचा पुढाकार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा अनुसुचित जाती मोर्चाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे.  या सभेत सिंधुदुर्ग जिसल्ह्यातील बौध्द,चर्मकार अल्पसंख्यांक समाजातील डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी व विविध समाज घटक उपस्थित राहणार आहेत. या सभेतून संविधानाबाबत विचारमंथन करताना संविधानाबद्दल असलेल्या तरतुदी समाजाला समजावून वक्ते सांगणार आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व समाजातील नागरिक, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नामदेव जाधव यांनी केले आहे.