समृद्ध आणि आनंदी जीवनासाठी निसर्गाचे संवर्धन करा ब्रिगेडीअर सुधीर सावंत

हे वर्ष शिवराज्याभिषेक म्हणून साजरे करणार
Edited by: देवयानी वरसकर
Published on: May 22, 2023 14:19 PM
views 82  views

हे वर्ष शिवराज्याभिषेक सोहळा वर्ष म्हणून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरे केले जाणार आहे. महाराजांची किर्ती देशातच नव्हे तर जगभर आहे. येत्या ६ जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभर साजरा करण्यात येणार आहे. असे आज ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी सांगितले.

      महाराज शेतकऱ्यांचे कैवारी होते. त्यांनी वनांच्या संवर्धनाचे महत्व जाणले होते. शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान, कृषि विज्ञान केंद्र आणि छत्रपती  शिवाजी कृषि महाविद्यालय यांचे वतीने यावर्षी विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. 

संपूर्ण महाराष्ट्रभर वृक्ष लागवड अभियान

    350 वा शिवराज्याभिषेक निमित्त या वर्षी २५००० झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वृक्ष पृथ्वीवरील फुफ्फुसे आहेत. निसर्गाचे संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. वृक्ष हवेतील कर्ब वायू शोषून मानवाला उपयुक्त असणारा प्राण वायू म्हणजेच ऑक्सिजनची निर्मिती करतात. महाराष्ट्रातील  विविध शासकीय, अशासकीय व खाजगी संस्थांच्या सहकार्यातून या वर्षी क्रांतिकारी वृक्ष लागवड अभियान हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त १ जुलै या कृषि दिनाच्या दिवशी या मोहिमेला सुरुवात करण्यात येणार आहे. हि मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर राबविणार असून त्यासाठी महाराष्ट्र शासन, शाळा, महाविद्यालये, कृषि विभाग, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, सैनिक फेडरेशन, NCC, NSS चे विद्यार्थी, ग्रामीण कृषि कार्यानूभव चे विद्यार्थी यांचे  सहकार्य घेण्यात येणार आहे.

भरडधान्य लागवड अभियान 2023

    यंदाचे हे वर्ष युनो मार्फत आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. कृषि विज्ञान केंद्र, किर्लोसच्या माध्यमातून या वर्षाच्या पावसाळी व हिवाळी हंगामात ५० हेक्टर क्षेत्रावर भरडधान्य अभियान राबवियात येणार आहे. भरडधान्य उर्जा व पोषण तत्वांचे आगर आहे. जागतिक अन्न सुरक्षा व आरोग्य यामध्ये भरडधान्याचा सिंहाचा वाटा आहे.  किर्लोस कृषि विज्ञान केंद्राद्वारे यावर्षी नाचणी, वरी , सावा अशा विविध भरडधान्य  पिकांच्या बियाण्याची उपलब्धता शेतकऱ्यांना करून  देण्यात  येणार असून लागवड तंत्रज्ञान, बियाणे संवर्धन  व प्रक्रिया विषयी तांत्रिक मार्गदर्शन करणार आहे. यावर्षी जिल्यात शेतकऱ्यांच्या शेतावर व केंद्राच्या प्रक्षेत्रावर मिळून ५० हेक्टर लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. विशेष करून पांढऱ्या नाचणीचा व वरी पिकाचा प्रसार करण्यात येणार आहे. 

भात लागवड अभियान -2023 

भात हे महत्वाचे तृणधान्य पिक आहे. या वर्षी आंतरराष्ट्रीय तृणधान्य  वर्ष जगभर साजरे केले जात आहे .५० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड हाती घेण्यात आली आहे. किर्लोस कृषी विज्ञान केंद्र आणि छत्रपती  शिवाजी  कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावर तसेच केंद्राच्या प्रक्षेत्रावर  भाताच्या विविध सुधारीत जातीची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये रत्नागिरी ७ या लाल तांदळाच्या भाताचे वाण, रत्नागिरी – ८, कर्जत २ अशा वाणांच्या बियाण्याचा पुरवठा शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना या बियाण्यांची लागवड नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करून करण्यास प्रवृत्त करण्यात येणार आहे. लागवड तंत्रज्ञान व बियाणे  संवर्धन या विषयी तांत्रिक मार्गदर्शन किर्लोस केंद्राद्वारे शेतकऱ्यांना  करण्यात येणार आहे.

समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्प

मानवाचे आरोग्य सुखी व संपन्न होण्यासाठी मी समृद्ध आणि आनंदी गाव प्रकल्पाची स्थापना केली आहे. समृद्ध आणि आंनदी गाव प्रकल्प किर्लोस कृषी विज्ञान केंद्राद्वारे राबविला जात आहे. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भरडधान्य मिशन, तृणधान्य मिशन, वृक्ष लागवड मिशन, नैसर्गिक शेती मिशन राबविण्यात येत आहे. 

नैसर्गिक शेती अभियान

किर्लोस कृषी विज्ञान केंद्राद्वारे नैसर्गिक शेतीची चळवळ गेल्या ७ वर्षापूर्वी पासून मी देशभर सुरु केली. या मोहिमेला केंद्र सरकारने मंजुरी दिली असून त्यासाठी मी खास प्रयत्न केले आहेत. भविष्यात हि नैसर्गिक शेतीची मोहीम जागतिक मोहीम होणार आहे. दर्जेदार अन्न निर्मितीसाठी व पर्यावरण संवर्धनासाठी तसेच शेतीतील होणारा भरमसाठ खर्च कमी करण्यासाठी नैसर्गिक शेती हा एक उत्तम पर्याय आहे.