
सिंधुदुर्गनगरी : सर्व्हर प्रॉब्लेम दाखवून गरजू नागरिकांना हक्काच्या रेशन धान्यापासून वंचित ठेवण्याचे काम चालू आहे. ज्यावेळी महिन्याच्या अखेरीस सर्व्हरची अशी परिस्थिती शेवटच्या पंधरवड्यात निर्माण झाल्यास शासनाने धान्य दुकानदारांना ऑनलाईन मिळत असलेल्या मार्जिनसहीत ऑफलाईन देण्याचा लेखी आदेश देऊन ग्राहकांचे हक्काचे असलेले धान्य देण्याची व्यवस्था करावी. असे न झाल्यास सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
रास्त धान्य दुकांनावर ऑनलाइनच्या सर्व्हर प्रॉब्लेम मुळे लोकांना धान्य मिळेनासे झाले आहे.या विषयास अनुसरुन सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी पदाधिकारी यांच्या वतीने जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना निवेदन सादर करण्यात आले .यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, विलास गावडे, विजय प्रभू, विधाता सावंत, संदेश बोबडे, जेम्स फर्नांडिस, लक्ष्मीकांत परुळेकर, अंकुश मलवारी यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात असे नमूद केले आहे की, सद्यःपरिस्थितीत या महिन्याच्या २४ तारखेपासून सर्व्हर प्रॉब्लेममुळे धान्य वितरण पूर्णपणे ठप्प झालेले आहे. यामुळे सामान्य गरजू रेशनधारकांना दिवसातून ४ वेळा दुकानात येऊन जावे लागत आहे. शासनाने ऑफलाईनची सुविधाही पूर्णपूर्ण बंद केलेली आहे. धान्य वितरणासाठी फक्त ३ दिवसच शिल्लक राहिलेले आहेत. या दिवसात कशा पद्धतीने धान्य वाटप करायचे ? कारण अद्यापपर्यंत सर्व्हर चालू झालेला नाही. या दोन दिवसात सर्व्हर चालू न झाल्यास सरासरी आपल्या जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानाचे ७० ते ८०% लोक धान्यापासून वंचित राहतील. ही गांभीर्याची बाब आहे.
तरी आपल्या जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन ज्यावेळी महिन्याच्या अखेरीस सर्व्हरची अशी परिस्थिती शेवटच्या पंधरवड्यात निर्माण झाल्यास शासनाने धान्य दुकानदारांना ऑनलाईन मिळत असलेल्या मार्जिनसहीत ऑफलाईन देण्याचा लेखी आदेश देऊन ग्राहकांचे हक्काचे असलेले धान्य देण्याची व्यवस्था करावी. असे न झाल्यास सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
उद्या पासून ऑफलाईन धान्य : जिल्हाधिकारी
दरम्यान, जिल्हाधिकारी यांची काँग्रेस पदाधिकार्यांनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी तातडीने ऑफ लाईन धान्य देण्यासंदर्भात रूट अधिकारी नेमून निर्णय घेण्यात येत असून उद्या पासून ऑफ लाईन धान्य मिळण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच ज्यांना या महिन्यात धान्य मिळणार नाही त्यांना मुदतवाढ देण्यात येईल व पुढील महिन्यात धान्य वितरण करण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले.असल्याचे इर्शाद शेख यांनी सांगितले.