वेंगुर्ल्यात मोदी सरकारच्या निषेधात काँग्रेसची घोषणाबाजी

राहुल गांधी यांच्यावरील कारवाई विरोधात उमटले पडसाद
Edited by: दिपेश परब
Published on: March 24, 2023 13:56 PM
views 209  views

वेंगुर्ला: 

भाजपने राहुल गांधी विरोधात अनेक ठिकाणी खटले दाखल करून त्यांना अडकवण्याचे षडयंत्र रचले आहे. अशाच एका प्रकरणात गुजरातच्या सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ज्या पद्धतीने मोदी सरकार राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा आम्ही काँग्रेसच्या वतीने निषेध करतो अशी टीका काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी वेंगुर्ला येथे केली आहे. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  

     यावेळी पुढे बोलताना इर्शाद शेख म्हणाले की, हुकुमशाही वृत्तीच्या भ्रष्ट मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्याने मोदी सरकार व भाजपा राहुल गांधी यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.  राहुल गांधी ज्या पद्धतीने मोदी सरकारच्या कुकर्माची लक्तरे वेशीवर टांगत आहेत त्यामुळे मोदी सरकारच्या पायाखालील वाळू सरकली आहे. त्यामुळेच राहुल गांधी यांना संसदीय कामकाज पासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वातंत्र्य पूर्वकाळात सुद्धा ब्रिटिश स्वातंत्र्य सैनिकांवर असेच गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकत होते त्याचप्रमाणे आज ही सत्तेत असलेले सत्य बोलणाऱ्या आणि जनतेच्या हितासाठी लढणाऱ्या आणि ठराविक उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या राहुल गांधीं यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई करत आहे. गोऱ्या ब्रिटिशाना काँग्रेसने या देशातून हाकलून दिले आता या काळ्या ब्रिटिशाना सत्तेवरून हाकलून देण्याची वेळ आली आहे. 

 

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास गावडे, तालुकाध्यक्ष विधाता सावंत, वेंगुर्ला पंचायत समितीचे माजी उपसभापती सिद्धेश परब, तालुका सेवादल अध्यक्ष विजय खाडे, रेडी जि.प. विभागीय अध्यक्ष मयूर आरोलकर, मयूरेश घाडी, साईश परब, किरण मुसळे, पांडुरंग सावंत, संकेत वेंगुर्लेकर, प्रथमेश हरमलकर, तन्मय वेंगुर्लेकर इत्यादी उपस्थित होते.