बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ चिपळूणात बंद बाबत संभ्रम

संघाने बंद नाकारला तर काही व्यापाऱ्यांचा सहभाग | व्यापारी महासंघा कडून घटनेच्या निषेधाचे प्रशासनाला निवेदन
Edited by:
Published on: August 23, 2024 14:58 PM
views 91  views

चिपळूण : महाविकास आघाडीने शनिवारी पुकारलेल्या बंद बाबत चिपळूण मधील व्यापाऱ्यांमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले आहे.व्यापारी महासंघाने बंद मध्ये सहभाग घेण्यास नकार दिला आहे.तर महासंघाचे माजी अध्यक्ष शिरीष काटकर व अन्य काही व्यापाऱ्यांनी सकाळी ९ ते १२ पर्यंत दुकाने बंद ठेवण्याची भूमिका घेतली आहे.त्यामुळे चिपळूणमध्ये बंद बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

बदलापूर येथील चिमुरडीवर झालेला अत्याचार व संशयितावर कारवाई करण्यास झालेल्या दिरंगाईचा निषेध तसेच आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी शिवसेना ठाकरे पक्ष,काँग्रेस व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष संघटित असलेल्या महाविकास आघाडीने शनिवारी महाराष्ट्र बंद ची हाक दिली आहे.त्यानुसार चिपळूण मधील महाविकास आघाडीने देखील चिपळूण बंद चे आवाहन केले असून पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट देखील केली आहे.त्यामुळे महाविकास आघाडी बंद वर ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महासंघाला आघाडीचे पत्र

चिपळूण महाविकास आघाडीने बंद चा निर्णय घेतल्यानंतर लगेच चिपळूण व्यापारी महासंघाला लेखी पत्र देत शनिवारी पुकारलेल्या बंद मध्ये आपण आपली दुकाने,व्यापार बंद ठेवून सहभाग घ्यावा असे आवाहन देखील या पत्राच्या माध्यमातून करण्यात आले होते.गुरुवारी सायंकाळी व्यापारी महासंघाला पत्र प्राप्त होताच तातडीने व्यापाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला व्यापारी महासंघाचे सर्व पदाधिकारी व व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बंदमध्ये सहभाग घेण्यास नकार

व्यापाऱ्यांच्या बैठकीत आघाडीचे पत्र तसेच शनिवारचा महाराष्ट्र बंद बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.मात्र कोणत्याही राजकीय पक्षाने पुकारलेल्या बंद मध्ये चिपळूण व्यापारी महासंघ सहभाग घेणार नाही.असे यापूर्वीच ठरवण्यात आले होते.त्यानुसार महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंद मध्ये चिपळूण व्यापारी महासंघ सहभाग घेणार नाही.असा थेट निर्णय यावेळी घेण्यात आला,तसा ठराव देखील बैठकीत पारित करण्यात आला.तसे महाविकास आघाडीला व्यापारी महासंघाकडून कळविण्यात देखील आले.त्यामुळे चिपळूण व्यापारी महासंघ शनिवारच्या बंद मध्ये सहभागी होणार नाही हे स्पष्ट झाले.

शिरीष काटकरांचा आक्षेप

व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष जेष्ठ व्यापारी शिरीष काटकर यांनी महासंघाच्या भूमिकेबाबत जोरदार आक्षेप घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.महाराष्ट्रात कुठेही घटना घडली की चिपळूणमध्ये पडसाद उमटतात.मग बदलापूरला १३ ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेबाबत व्यापारी महासंघाच्या एकाही पदाधिकाऱ्याने ब्र देखील काढला नाही असे का.?उरण च्या घटने बाबत जी तत्परता दाखवली ती बदलापूरच्या घटने बाबत का नाही.?बदलापूर ची घटना अत्यंत गंभीर असून प्रचंड वेदनादायी आहे.तसेच प्रशासनाने कारवाई बाबत जो गलथानपणा दाखवला तो संतापजनक आहे.त्यामुळे निषेध करावाच लागेल असेही काटकर यांनी नमूद केले आहे.

शिरीष काटकर यांनी भूमिका स्पष्ट करताना म्हटले आहे की माझी अनेक व्यापारी बांधवांशी चर्चा झाली असून व्यापारी बांधव स्वतःहून बंद मध्ये सहभागी होण्यास तयार झाले आहेत.त्यामुळे शनिवारी सकाळी ९ ते  दुपारी १२ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे.त्यामध्ये अनेक व्यापारी सहभाग घेतील आशा शब्दात त्यांनी बंद बाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.त्यामुळे चिपळूण मधील व्यापारी महासंघ बंद च्या विरोधात तर काही व्यापारी बंद च्या बाजूने असे चित्र निर्माण झाले आहे.